गोंदिया - मुलाच्या नावे असलेल्या जमिनीच्या मोजणीसाठी 1 हजार रुपयांचे शासकीय शुल्क भरले असतानाही तक्रारदाराकडे आणखी 4 हजार रुपयांच्या लाचेची मागणी गोरेगावच्या उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील नगर भूमापन लिपिकाने केली. त्या लिपिकाला लाच रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टीमने रंगेहात पकडले. राजकपूर कचरू मेश्राम (51 वर्ष) असे त्या आरोपी लिपिकाचे (वर्ग 3) नाव आहे. ही कारवाई काल मंगळवारकरण्यात आली.
हौसीटोला येथील भूमापन गट क्रमांक 67 मध्ये तक्रारदाराच्या मुलाच्या ना वे 1.09 हे. आर. जमीन आहे. या जमिनीची मोजणी 7 डिसेंबर 2020 रोजी लिपिक मेश्राम याने करून दिली. त्या वेळी त्याने खर्च-पाण्याचे म्हणून तक्रारदाराकडे 5 हजार लाच रकमेची मागणी केली. त्यावर तक्रारदाराने त्याला मोजणीचे शासकीय शुल्क भरल्याचे सांगून रक्कम कमी करण्याची विनंती केली. यावर 1 हजार रुपये कमी करून 4 हजार रुपये द्या, अन्यथा तुम्हाला ‘क’ प्रत देणार नाही, असे लिपिकाने म्हटले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार -
तक्रारदार 22 डिसेंबर रोजी जमिनीची ‘क’ प्रत घेण्याकरिता गोरेगाव भूमी अभिलेख कार्यालयात नगर भूमापन लिपिक राजकपूर मेश्राम यांच्याकडे गेले. दरम्यान ‘क’ प्रतसाठी त्याने 4 हजार लाच रकमेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने नाईलाजाने 1 हजार रुपये दिले. यावर उर्वरित 3 हजार रुपये दिल्याशिवाय तुम्हाला ‘क’ प्रत मिळणार नाही, असे बोलून 3 हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी 28 डिसेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली.
आरोपींविरोधात गुन्हा दाखल -
लाचलुचपत विभागाने लिपिक मेश्राम याने केलेल्या लाच रकमेची पडताळणी केली. त्यानंतर 29 डिसेंबर रोजी गोरेगावच्या भूमी अभिलेख कार्यालयात लाचेचा यशस्वी सापळा रचला. यात हौसीटोला येथील सदर शेतजमिनीची ‘क’ प्रत देण्याकरिता तक्रारदाराकडे 3 हजार रुपयांची मागणी करून ती लाच रक्कम पंचासमक्ष स्वीकारली. आरोपीविरुद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात कलम 7, लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 1988 (सुधारित अधिनियम 2018) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा - काँग्रेसच्या आमदार अपात्रता याचिकेवर चार जानेवारीला होणार सुनावणी