गोंदिया- जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथे आज दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन पार पडले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मुरलीधर गिरडकर व गोंदिया जिल्ह्याचे न्यायाधीश सुहास माने यांच्या हस्ते या नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना न्यायमूर्ती मुरलीधर गिरडकर म्हणाले, या न्यायालयात सर्व सुविधा उपलब्ध असून त्यामुळे पक्षकार, वकील, न्यायाधीश यांना आवश्यक असलेल्या सर्व गरजा पूर्ण होतील. त्याचबरोबर न्यायालयीन कामे सुद्धा जलद गतीने पार पडतील. यामुळे सडक अर्जुनीच्या पक्षकारांना जलद न्याय मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच, या न्यायालयात लोक न्यायालय व कायम लोक अदालतचे वेगळे दालन तयार करण्यात आले आहे. या न्यायालयात नेहमीकरीता लोकअदालती घेतल्या जातील. सर्वोच्छ न्यायालयाचे जे निर्देश दिले आहे, त्याप्रमाणे येथे लोकअदालती होतील. लोकांची जागृती व्हावी यासाठी प्रत्येक तालुक्यातील न्यायाधीश गावोगावी जाउन शिबीरे सुद्घा घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
या शिबीरांमुळे लोकांमध्ये जागुती निर्माण झाली असून, रोज येणाऱ्या खटल्यांच्या संख्येमध्ये कमी झाली आहे. मी स्वत:ह साकोलीला असतांना माझ्याकडे १३ ते १५ दावे दाखल व्हायचे. पण आता लोकांमध्ये जागृती निर्माण झाली आहे. बरचसे लोकं आता सामंजस्याने प्रकरणे मिटवित असल्याने येणाऱया प्रकरणांची संख्या कमी झाली आहे. लोकं सज्ञान व विचारवंत असल्याने न्यायालयांना त्यांचे सहकार्य लाभत असल्याचे न्यायमूर्ती मुरलीधर गिरडकर म्हणाले. न्यायमुर्ती मुरलीधर गिरडकर यांच्या हस्ते न्यायालयाच्या आवारात वृक्षारोपन सुद्धा करण्यात आले.