गोंदिया - कोरोनाबाधितांची सातत्याने वाढणारी संख्या पाहता नगरपरिषदेने आमदार विनोद अग्रवाल यांच्या आग्रहास्तव शहरात दोन दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे. नगरपरिषद क्षेत्रात महामारीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नगराध्यक्ष अशोक इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत 8 व 9 ऑगस्टला दोन दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आलय. बैठकीला गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल, नगरपरिषद उपाध्यक्ष शिव शर्मा, मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण, नगर परिषदेचे सदस्य, नगर परिषदेतील सर्व पक्षाचे गटनेते व व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांनी वाढती रुग्णसंख्या, शहरातील वाढते प्रतिबंधित क्षेत्र, शहरी भागातील सर्व्हे या बाबतची सविस्तर माहिती सभेत दिली. त्यानंतर येणाऱ्या काळात समूह संसर्ग रोखण्यासाठी पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्याचे ठरवण्यात आले. तसेच ४८ तासांसाठी सर्वानुमते ठराव पारित करण्यात आला. जनता कर्फ्यूमध्ये दवाखाने, मेडिकल दुकाने, दुग्ध व दुग्धजन्य पदार्थाचे व्यवसाय सुरू राहतील. सकाळी ९ वाजेपर्यंतच बाहेरील गावावरून येणारे दुग्ध विक्रेते यांनी दुधाचे वितरण करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
जनता कर्फ्यूचा कालावधी फक्त २ दिवसांचा राहणार असून १० ऑगस्ट २०२० पासून बाजारपेठा नियमानुसार विहीत वेळेत सुरू राहणार आहेत.