गोंदिया - लॉकडाऊन दरम्यान महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाने मीटर रिडिंग्स घेतले नाहीत. आधीच्या बिलांची सरासरी काढून नागरिकांना बिलं वाटण्यात आली. अनेकांनी अव्वाच्या सव्वा बिलं आली आहेत. लॉकडाऊन दरम्यान अनेकांचे रोजगार गेल्याने लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे एकूण लाइटबिलापैकी ३०० युनिट वीज दर माफ करावे, अशी मागणी अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी केली. यासाठी त्यांनी जिल्ह्यातील वीज वितरण कार्यलयावर धडक मोर्चा काढला.
मात्र लॉकडाऊनच्या काळात मोर्चा काढणे नियमबाह्य असल्याने वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांनी स्वतः आंदोलना स्थळी येऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारले. तसेच संबंधित निवेदन वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ पाठवण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

या धडक मोर्च्यात सहभागी होण्यासाठी शेकडो वीज ग्राहकांनी उपस्थिती लावली. आमदार अग्रवाल यांच्या माध्यमातून वीज ग्राहकांच्या अनेक समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आल्या. ऐन पावसात लोक वीजबिल माफ करण्याचा मागणीसाठी आक्रमक झाले.
आगामी पावसाळी अधिवेशनात विधानसभेत हा मुद्दा उचलून धरणार असल्याचे आमदार अग्रवाल यांनी सांगितले.