गोंदिया - गोंदियात आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. येथे एकाच दिवशी एका महिलेला कोरोनाचे दोन डोस दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एकीकडे कोरोना रोखण्यात रामबाण समजले जाणाऱ्या कोविशिल्डचा तुटवडा आहे. त्यात एका 62 वर्षीय महिलेला 10 मिनिटांच्या अंतराने दोन डोस देण्यात आल्याचा प्रकार गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील गिधाडी येथील लसीकरण केंद्रावर घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. लस दिलेल्या महिलेच्या आरोपाने प्रशासनाची एकच तारांबळ उडाली आहे. तर दुसरीकडे आरोग्य विभाग महिलेच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवून आहे. अनुसया केवलचंद पारधी (वय 62) असे त्या महिलेचे नाव असून त्या महिलेची प्रकृती सध्या स्थिर आहे.
गिधाडी या गावातील अनुसया केवलचंद पारधी (वय 62 वर्ष) या ग्राम पंचायतीच्या माजी सदस्य असून त्यांनी कोविशिल्ड इंजेक्शनचा पहिला डोस घेण्याकरिता गावातीलच शाळेत गेल्या आहेत. केंद्रावर उपस्थित आरोग्य सेविकेने त्यांना पहिला डोस दिला त्यांना काही वेळ तिथेच थांबण्यास सांगण्यात आले. मात्र 10 मिनिटाने त्याच महिलेचे नाव घेऊन त्यांना पुन्हा बोलवण्यात आले व दुसरा डोस देखील देण्यात आला. महिलेने घरी जाऊन हा सर्व प्रकार सांगितला. महिलेच्या मुलाने बघितले असता दोन इंजेक्शन दिल्याचे घाव दिसून आले. या प्रकारामुळे गिधाडी येथे तणावाची स्थिती आहे. सध्या त्या महिलेची स्थिती स्थिर असून त्यांच्या प्रकृतीवर काही परिणाम होतो काय, याकडे लक्ष लागले आहे.
याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा प्रकार नाकारला असून गिधाड़ी लसीकरण केंद्राला त्या दिवशी 50 लोकांना लस देता येईल इतकेच 50 डोस व 50 सीरिंज दिल्या होत्या. 50 लोकांचे नावानुसार लसीकरणही झाले आहे. त्यामुळे अतिरिक्त डोस कोणाला देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय संबधित महिलेची तशी आम्ही तपासणी करत असून कोणतेही नुकसान जाणवले नाही. यामुळे आता गोंदिया जिल्हा प्रशासन काय भूमिका घेते, हे बघणे गरजेचे आहे.