गोंदिया - देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकजण लढत आहे. अशा बिकट परिस्थितीमध्ये प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा सुर्याटोला परिसरातील वार्ड क्रमांक १३ येथील नागरिकांनी सत्कार केला. त्यांना पेढे भरवून फुलांचा वर्षाव करण्यात आला आणि रोख रक्कम दिली. तसेच सुरक्षेसाठी मास्क देखील देण्यात आले.
कोरोनाची महामारी सुरू असताना सफाई कर्मचारी घरोघरी जावून कचरा गोळा करत आहेत. सर्वत्र स्वच्छता ठेवण्याचे काम हे कर्मचारी करत आहेत. त्यामुळे शहरातील सुर्याटोला परिसरातील नागरिकांनी त्यांचा सत्कार करण्याचे ठरवले. त्यानुसार आज सफाई कर्मचारी येताच त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. तसेच त्यांच्या गळ्यात फुलांचा हार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला. नागरिकांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. विशेष म्हणजे सोशल डिस्टन्सिंग ठेवत या नागरिकांना पेढे भरवण्यात आले. तसेच मास्कचे वाटप करण्यात आले.
शहरात सर्वत्र कोरोना विषाणूचा भय असतानाही स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणारा सफाई कामगार समाजापासून वंचित राहिलेला घटक आहे. मात्र, आजच्या स्थितीत सफाई कामगार कोरोनाच्या संकटात मोलाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे अशा कामगारांचा नागरिकांनी सत्कार करणे ही बाब नक्कीच कौतुकास्पद आहे, तर गोंदिया येथील वॉर्ड क्रमांक १३ मध्ये सफाई कर्मचाऱ्यांचा सम्मान करण्यात आला त्याचप्रमाणे प्रत्येक वॉर्डात असा सन्मान केला, तर कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल, असे नागरिक म्हणाले.