गोंदिया - जिल्ह्यात गेल्या २४ तासापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर सडक-अर्जुनी सह जिल्ह्यातील 6 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. यात गोरेगाव, देवरी आणि सडक-अर्जुनी तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. हा अंदाज खरा ठरला असून शनिवारी रात्री पासूनच जिल्ह्यात सर्वत्र रिमझिम पावसाला सुरवात झाली. सकाळच्या सुमारास गोरेगांव, देवरी, सड़क-अर्जुनी या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला असून त्यामुळे या तिन्ही तालुक्यातील नदी, नाले व रस्त्यावरून पुराचे पाणी वाहत आहे. यामुळे अनेक वाहतूक मार्ग बंद झाले असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
देवरीपासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या डवकी फाट्याजवळच्या नाल्याच्या पुलावरुन पाणी वाहत आहे. यामुळे आमगांव-देवरी मार्ग बंद झाला आहे. या पुरात 2 म्हशी वाहून गेल्याची माहिती आहे. सोबतच सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा-खजरी मार्गावरील नाला ओवर-फ्लो झाल्याने कोहमारा-गोंदिया वाहतूक बंद झाली आहे. तर चुलबंद नदी दुथळी भरून वाहत असल्याने गोंगले, पांढरी, कोसमतोंडी, मुरदोली मार्ग सुद्धा बंद झाले आहेत. तर सडक-अर्जुनी तालुक्यासह गोरेगाव तालुक्यातील मोहाडी, देवरी तालुक्यातील देवरी व चिचगड मंडळातही अतिवृष्टी झाली आहे.
सडक-अर्जुनीत 76.60 मिमी पावासाची (अतिवृष्टीची) नोंद करण्यात आली आहे. गोरेगाव तालुक्यातील 3 पैकी मोहाडी मंडळात 112.60 मिमी (अतिवृष्टी), देवरी तालुक्यातील 3 पैकी देवरी मंडळात 85.00 मिमी (अतिवृष्टी) व चिचगड मंडळात 85.00 मिमी, सडक अर्जुनी तालुक्यातील 3 पैकी 3 ही मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. यासह सौंदळमध्ये 70.60 मिमी, डव्वा 71.60 मिमी व सडक-अर्जुनीत-70.60 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. या मुसळधार पावसामुळे आमगाव-देवरी राज्य महामार्गावरील नाल्याला पूर आला असून बोरगाव-डवकी ते देवरी वाहतूक बंद पडली आहे. तसेच मुरदोली-कोसमतोंडी मार्गावरील नाल्यांना पूर आल्याने या मार्गावरीलही वाहतूक बंद पडली आहे.
'मी तुम्हाला पाहू की माझ्या मुलांना पाहू' -
चिचगड परिसरात शनिवारी रात्री आलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील जगदीश रामप्रसाद धरमगुळे यांचे घर पडले आहे. यामुळे घरातील अन्न धान्य, कपडे व जिवनावश्यक वस्तुंचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. ग्रामपंचायतीकडे घरकुलाकरिता अर्जकरुनही त्यांना घरकुल किंवा कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ अद्यापही मिळालेला नाही.यातच कालच्या मुसळधार पावसामुळे अनेक घरात पाणी शिरल्याने उपाययोजना करावी म्हणून सरपंच कल्पना गोसावी यांच्याकडे गेलेल्या नागरिकांना सरपंचांनी, 'मी तुम्हाला पाहू की माझ्या मुलांना पाहू !' अशा शब्दात प्रतिक्रिया देत परतवून लावली आहे. यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पडलेल्या घरांचे पंचनामे करुन तत्काळ मदत द्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात येत आहे.