गोंदिया - प्रजासत्ताक दिनाचा ७१ वा वर्धापन दिन गोंदिया शहरातील कारंजा पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर साजरा करण्यात आला. यावेळी राज्याचे गृहमंत्री व गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्या नंतर पोलिसांची मानवंदना स्वीकारून मान्यवरांच्या भेटीगाठी घेतल्या व उपस्थित नागरिकांना शासनाच्या योजनांची माहिती दिली.
पोलीस भर्तीच्या पहिल्या टप्याला सुरवात -
राज्यात कोरोनाच्या काळात ३३० पोलीस शहीद झाले. मात्र, पोलिसांनी हिंमत हारली नाही. तर आतापर्यंत १२५०० पदांची पोलीस भर्ती प्रक्रिया कधी ही घेण्यात आलेली नाही. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या काळात ही पोलीस भर्ती घेण्यात येत आहे. या पोलीस भर्तीच्या पहिल्या टप्याला सुरवात झाली असून ५३०० पदांची भर्ती प्रक्रिया सुरु झालेली आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
महिलांवर होणाऱ्या अत्याचारासाठी शक्ती कायदा -
महिलांवर आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली आहे. त्याकरिता राज्यात कायद्याची चौकट बळकट करून जलद गतीने निर्णय देण्याचा प्रयत्न असून आरोपीला कठोर शिक्षा देण्याकरिता शक्ती कायदा आणल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच या करिता 21 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमार्फत राज्यातील विविध महिला संघटनांच्या भेटी घेवून त्यांच्या मतांचाही या कायद्यात समावेश करण्यात येणार आहे, असेही अनिल देशमुख म्हणाले.
मिशन वन वन टू -
राज्यात अनेक प्रकल्प राबवत असून मिशन वन वन टु येत्या तीन चार महिन्यांत सुरु करण्यात येणार आहे. नागरिकांनी ११२ या क्रमांकावर कॉल केल्यास त्यांना आकस्मिक सेवेसह पोलीस सुरक्षा तसेस आदी सेवा या उपक्रमांतर्गत देण्यात येणार आहे. यासाठी २५०० हजार चार चाकी तर, २००० हजार दुचाकी वाहने खरीदी करणार आहे. ही वाहने प्रत्येकी जिल्ह्यात दिली जाणार आहेत. तसेच वन वन टू सेंटरचे काम प्रत्येक जिल्ह्यात सुरु झाले आहे. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
हेही वाचा - राज्यपालांच्या 'त्या' भूमिकेविषयी अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले..