गोंदिया - सरकारी शाळेचे नाव घेताच भौतिक सुविधांची समस्या डोळ्यासमोर येते. गोंदिया जिल्हा परिषदेच्या शाळाही याला अपवाद नाहीत. गोंदियात जिल्हा परिषदेच्या १ हजार ३९ शाळा आहेत. त्यापैकी ३७३ शाळांमध्येच विद्यार्थ्यांसाठी शुध्द पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध आहे. काही शाळांमधील विद्यार्थ्यांना विहीर, नळ व हॅन्डपंपच्या पाण्यावरच आपली तहान भागवावी लागत आहे. शासनाचा पुरस्कार मिळालेली भागी गावाच्या शाळेची देखील अशीच अवस्था आहे. एकीकडे शाळा डिजिटल करण्याचा घाट घातला जात आहे तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना साधे पिण्याचे पाणी देखील मिळत नाही, अशी अवस्था बहुतेक झेडपी शाळांची अवस्था आहे.
जेवण मिळते मात्र, पाणी नाही -
गोंदिया जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक विभागाच्या इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत १ हजार ३९ शाळा सुरू आहेत. या शाळांमध्ये दीड लाखांपेक्षा जास्त गरीब व सामान्य कुटुंबांतील मुले शिक्षण घेत आहेत. समग्र शिक्षा अभियानामार्फत विद्यार्थ्यांना दुपारचे जेवण दिले जाते. मात्र, जेवणा सोबात पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यास प्रशासन अपयशी ठरत आहे. शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार १ हजार ३९ शाळांपैकी फक्त ३७३ शाळांमध्ये शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. इतर विद्यार्थ्यांना शुद्ध पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे.
विद्यार्थ्यांना मिळावे शुद्ध पाणी -
अशुद्ध पाणी पिल्याने जलजंय आजाराची शक्यता नाकारता येत नाही. ३७३ शाळांमध्ये शुद्ध पाण्याचा पुरवठा होतो. ६६६ शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी नळ, हॅन्डपंप व विहीरीच्या माध्यमातून मिळते. म्हणजेच निम्याहून अधिक शाळांमध्ये शुद्ध पाणी मिळण्याची शाश्वती नाही. शिक्षणावर ग्रामपंचायतींना वित्त आयोगाकडून मिळालेल्या निधीतून ५ टक्के खर्च करण्याचे अधिकार दिले आहे. या निधीतून संबंधित ग्रामपंचायतींनी आणि जिल्हा परिषदेने शुद्ध पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी पालक करत आहेत.