गोंदिया - कोरोना महामारीमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक डॉक्टर्स, पोलीस, सफाई कर्मचारी स्वत:च्या कुटुंबीयांपासून दूर राहत या व्हायरसपासून लोकांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. अनेक कोरोना योद्ध्यांना आपल्या घरच्यांना भेटतानाही अडचणी येत आहेत. त्यामुळे या लढ्यात त्यांचे योगदान वाखाणण्याजोगे आहे. दरम्यान, गोंदियातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोनाबाधित कर्मचारी सचिन लोखंडेचा हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा उभारल्याशिवाय राहणार नाही.
सचिनने जिल्हा शल्य चिकित्सकांच्या खोलीबाहेर उभे राहत आपली व्यथा मांडली. मागील सात वर्षांपासून सचिन गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत आहे. सचिनने २७ ऑगस्टला स्वत:ची कोरोना चाचणी करून घेतली. त्यानंतर त्याने २८ ऑगस्टला आई, वडील, बहीण यांचीही कोरोना चाचणी केली. याचदिवशी त्याला आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजले. या चाचणीमुळे त्याने स्वत: ला इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन केले. त्यामुळे त्याचे आई, वडील आणि बहीण हे कोरोना चाचणी करून घरी परत गेले.
३० ऑगस्टला सचिनचे वडिल प्रकाश लोखंडे यांना ह्रदयविकाराचा झटका आला. रूग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यूच्या तासाभरापूर्वी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. सचिनचा भाऊ नितीनने या चाचणीची माहिती क्वारंटाइन असलेल्या सचिनला दिली. सचिनने क्वारंटाइन सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या मित्राच्या नावाने पीपीई किट स्वत: कडे घेत रूग्णवाहिकेद्वारे जिल्हा सामान्य रूग्णालय गाठले. त्यानंतर सचिनने जिल्हा शल्य चिकित्सकांच्या खोलीबाहेर जाऊन आपली व्यथा मांडली. आपल्या वडिलांची कोरोना चाचणी उशिरा झाली, आपल्यामुळे त्यांचा जीव गेला, कोरोनाग्रस्त लोकांची सेवा करताना आपल्या घरी वाईट परिस्थिती झाली, अशी आपबिती त्याने जिल्हा शल्य चिकित्सकांच्या खोलीबाहेर सांगितली. सचिनच्या भावाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्याच्यावर नागपुरातील वैद्यकीय महाविद्यलयात उपचार सुरु आहेत.