गोंदिया - वैनगंगा नदी काठावर जुगार खेळणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत ६ लाखांच्या मुद्देमालासह ९ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. महत्वाची बाब म्हणजे, पोलिसांना पाहून आरोपींनी नदी पात्रात उडी घेत पळ काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी नदी पात्रात जाऊन आरोपींना अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया तालुक्याच्या नवरगावातील नदी काठावर मोठ्या प्रमाणात जुगार खेळला जात असल्याची माहिती गोंदिया ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. तेव्हा पोलिसांनी अचानक जुगार खेळत असलेल्या ठिकाणी छापा टाकला. पोलिसांना पाहताच जुगाऱ्यांनी मिळेल त्या वाटेने धूम ठोकली. काहींनी नदी पात्रात उडी घेतली तर काही जंगलाच्या दिशेने पळाले. पण पोलिसांनी पाठलाग करत आरोपींना अटक केली.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे -
कमलेश सुरेन्द्र बन्सोड (वय २८ रा. टेमनी), कोहिनूर छगनलाल वासनीक (वय ३४ रा. गुदमा), काजु अनंतराम हुकरे (वय ३६ वर्ष रा. संजयनगर गोंदिया), अजय जुगलकिशोर सानेकर (वय ३३ रा. शास्त्रीवार्ड गोंदिया), अभिषेक रिंकुसिंग बैस (वय २४ रा. गौतमनगर गोंदिया), जितेंद्र मनमोहनसिंग पारासर (वय ३८ रा. छोटा गोंदिया), प्रविण अशोक आंबेडारे (वय २८ रा. फुलचूर गोंदिया) यांच्यासह दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी या कारवाईत ९ दुचाकी वाहने, ७ मोबाईल आणि २२ हजार रोख रक्कम असा ६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपीविरोधात गोंदिया ग्रामीण पोलिसात महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - कोरोनामुळे ऑक्सिजनच्या मागणीत वाढ, गोंदियात मुबलक साठा