गोंदिया - गोंदिया शहराच्या सिवी लाईन भागात राहणाऱ्या कल्याणी जगताप ( Gondia Girl Kalyani Jagtap Cracked UPSC ) या तरुणीने नुकतेच जाहीर झालेल्या युपीएससी परीक्षेच्या दुसऱ्या यादीत १३ वा क्रमांक मिळवीत यश संपादन केले आहे. भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम ( Apj Abdul Kalam ) माझे प्रेरणास्त्रोत आहेत, अशी प्रतिक्रिया तिने ईटीव्ही भारतसोबत बोलताना दिली. ( Kalyani Jagtap with ETV Bharat ) कल्याणी जगताप हीने लहानपणा पासूनच आयएएस होण्याची इच्छा केली होती. तीचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे. २८ लोकांच्या एकत्र कुटुंबात वयाच्या २८व्या वर्षी आयएएस होण्याचा मान कल्याणीने मिळविला आहे.
अभियांत्रिकीनंतर स्पर्धा परीक्षेकडे -
कल्याणीने अभ्यास सुरु केल्यानंतर तिच्या घरच्यांनीदेखील तिला साथ दिली. कल्याणीने वर्ग १ ते १२ पर्यंतचे शिक्षण गोंदियातूनच पूर्ण केले. त्यानंतर सिव्हिल अभियांत्रिकीचे शिक्षण नागपुरातील व्हीएनआयटी महाविद्यालयातून पूर्ण केले. यानंतर २०१५मध्ये ती स्पर्धा परीक्षेकडे वळली.
पाचव्या प्रयत्नात यश -
वर्ष २०१६ मध्ये तिने पहिल्यांदा युपीएसीची परीक्षा दिली. त्यात तिला यश मिळाले नाही. मात्र, तरी तिने मागे वळून न पाहता जिद्द आणि चिकाटीने परिश्रम घेत दुसऱ्यांदा २०१७ मध्ये पूर्व आणि मुख्य या दोन्ही परीक्षा पास करीत ती मुलाखतीपर्यंत पोहोचली. मात्र, तिथेही तिला यश आले नाही. मात्र, तिने खचून न जाता पुन्हा जिद्द आणि चिकाटीने आपले प्रयत्न सुरूच ठेवले. अखेर २०२०मध्ये पाचव्या प्रयत्नात तिला यश मिळाले.
आपल्या यशाचे श्रेय तिने आपल्या आई वडिलांना दिले आहे. पूर्व राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्याकडून प्रेरणा घेत आयएएस होण्याचा मार्ग तिने मिळविला, असे तिने ईटीव्ही भारतसोबत बोलताना सांगितले.