गोंदिया- फूस लावून पळवून नेलेल्या मुलीला तिच्या आईशी भेटविण्यात रेल्वे सुरक्षा दलाला यश आले आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. सदर प्रकरण मानव तस्करीचा असल्याचा संशय रेल्वे पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. खुशबू (नाव बदललेले) असे या मुलीचे नाव आहे.
खुशबू ही तिरोडा तालुक्यातील बेलाटी बुद्रुक येथील निवासी असून ती गिरजाबाई कन्या विद्यालय येथे ८ व्या वर्गात शिकते. तिला गंगुबाई नामक महिलेने आनंद बाजार दाखविण्याच्या बहाण्याने फूस लावून पळविले होते. त्यानंतर गंगुबाईने तिला जबरदस्ती शहरात फिरविले. फिरत असताना खुशबूला महिलेवर संशय आला. त्यामुळे तिने गंगुबाईपासून आपली सुटका करत गोंदिया रेलवे स्टेशन गाठले.
खुशबू घाबरलेल्या अवस्थेत रेल्वे स्थानकावर बसून होती. तिला पाहून रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाला संशय आला. जवानांने खुशबूला विश्वासात घेऊन तिच्याशी विचारपूस केली. त्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाकडून खुशबूच्या काकांशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर खुशबूला तिच्या आईच्या सुपुर्द करण्यात आले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून रेल्वे सुरक्षा दलाकडून गंगुबाईचा शोध घेतला जात आहे.
हेही वाचा- गोंदिया : खाण बंद करण्यासाठी गावकऱ्यांचा कंपनीवर धडक मोर्चा