गोंदिया - सारस पक्षी संवर्धनासाठी गोंदिया जिल्ह्यात वनविभाग तसेच स्वयंसेवी संस्था काम करत आहेत. तरीही त्यांचा अधिवास सुरक्षित राहण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी तसेच स्थानिकांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. त्यामुळे त्याचे कुठे तरी कौतुक व्हावे, यासाठी गोंदिया जिल्ह्यात एकदिवसीय "सारस मित्र संमेलनाचे" आयोजन करण्यात आले होते. यावेळी सारस पक्षांसाठी काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला.
सारस हा जगातील सर्वात मोठा व उडणारा पक्षी असून याचा अधिवास महाराष्ट्रात केवळ गोंदिया जिल्ह्यात आहे. आज गोंदिया व बालाघाट जिल्ह्याचा सीमावर्ती भागाचा विचार केला असता, या ठिकाणी ४० च्या आसपास सारस पक्षाची जोडपी आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या संख्येत वाढ होणे हे या ठिकाणचे आश्चर्य मानावे लागेल. सन २००४ च्या सुमारास या ठिकाणी केवळ तीन ते चार सारस पक्षाचे जोडपे होते. त्यामुळे सारस पक्षांचे अस्तित्व धोक्यात आले होते. काही स्वयंसेवी संस्था तसेच वनविभागाने संयुक्त मोहीम हाती घेत त्याच्या संवर्धनाचे काम हातात घेतले.
स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करत सारस पक्षी हा शेतकऱ्यांचा शत्रू नसून मित्र आहे, याची जाणीव करण्यात आली. त्यामुळे सारस पक्षाची होणारी शिकार थांबून, त्याचा अधिवास सुरक्षित होत गेला. आता सारस पक्षांच्या संख्येत वाढ झाली आहे. गोंदिया व बालाघाट जिल्ह्यातील अनेक शेतकरी सारस पक्षाच्या संवर्धनासाठी काम करत आहेत. त्यामुळे त्यांचे कुठे तरी कौतुक व्हावे, यासाठी गोंदिया येथे एकदिवसीय सारस मित्र संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्थानिक तसेच शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील २१ तर बालाघाट येथील १४ शेतकऱ्यांचा समावेश आहे.