गोंदिया - जिल्ह्यातील सालेकसा वनपरिक्षेत्रातंर्गत कक्ष क्रमांक ४३८ मध्ये सागवन वृक्षाची कत्तल करून लाकडे अवैधरित्या वाहून नेणाऱ्या ३ आरोपींना सालेकसा वनविभागाने अटक केली. यशवंत कारू खंडाते, धनराज कटरे व जैयलाल टेकाम, असे आरोपींचे नाव आहेत.
सालेकसा वनक्षेत्रात सागवान वृक्षाची अवैधरित्या कत्तल करीत असल्याची गुप्त माहिती सालेकसा एफ. डी. सी. एम. वनविभागाला मिळाली. या माहितीच्या आधारे सालेकसा एफ. डी. सी. एम. ने आपली चमू घेउन कक्ष क्र. ४३८ हद्दीत छापा टाकला. यावेळी त्यांना ३ जण वृक्षांची तस्करी करताना आढळून आले. त्यापैकी यशवंत खंडाते याला अटक करण्यात आली. त्यानी दिलेल्या माहितीच्या आधारे दुसऱ्या दोन्ही आरोपींना अटक केली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते.
सालेकसा तालुका हा महाराष्ट्राचे प्रवेशद्वार असून छत्तीसगढ राज्याच्या सीमालगत हा तालुका आहे. तसेच नक्षलग्रस्त व जंगलग्रस्त म्हणून हा तालुका ओळखला जातो. सालेकसा तालुक्यातील घनदाट जंगलात मोठ्या प्रमाणात सागवानाचे झाडे आहेत. येथील मौल्यवान सागवानाची कत्तल करून लगतच्या छत्तीसगढ राज्यात तस्करी केली जात आहे.
यापूर्वीसुद्धा अनेक सागवान तस्करांना वनविभागाने पकडल्याचा घटना घडल्या आहेत. आता पुन्हा ३ आरोपी सागवन वृक्षाची कत्तल करून तस्करी करीत असल्याचे उघड झाल्याने वृक्षप्रेमींमध्ये मोठी खळबळ माजली आहे. अवैध वृक्षतोडीला आळा बसावा यासाठी शासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, सालेकसा तालुक्यात सागवान वृक्षाची कत्तल करून तस्करी सुरूच आहे.