गोंदिया - शेतात पिकाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर दबा धरून बसलेल्या रानडुकराने अचानक हल्ला करुन ठार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील किकरीबाड येथे बुधवारी सायंकाळच्या सुमारास लक्षात आली. भुसरामा साधू मेश्राम (वय ५५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
भुसराम मेश्राम हे बुधवारी सकाळी शेतात पिकाची पाहणी करण्यासाठी गेले होते. मात्र, दुपार झाली तरी भुसाराम घरी परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी काळजीपोटी शेतात जाऊन पाहणी केली असता, ते रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळले. याची माहिती गावकऱ्यांना होताच गावकऱ्यांनी भुसाराम मेश्राम यांच्या शेताकडे धाव घेतली. या घटनेची माहिती वन विभागाचे अधिकारी आणि आमगाव पोलीस ठाण्याला दिली. माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदनासाठी आमगाव रुग्णालयात पाठवण्यात आला. आमगाव पोलीस पंचनामा करत पुढील तपास करत आहेत. वन विभागाला अनेकदा रानडुकरांचा हैदोस रोखण्यासाठी माहिती दिली तरी वनविभागाने याकडे लक्ष नाही दिले. यामुळे आज भुसाराम मेश्राम यांना आपले प्राण गमवावे लागले. तर वन विभागाने मृत भुसाराम मेश्राम यांच्या कुटुंबीयांना प्रसाशनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यात यावी, अशी मागणी गावकरी करीत आहेत.