गोंदिया - धानशेती परवडेनाशी झाली असून पारंपरिक पीकपद्धतीला बगल देत शेतकरी आता नवनवीन प्रयोग करू लागले आहेत. धाबेटेकडी आदर्श येथील एका युवा शेतकऱ्याने २ एकर शेतीत काटे कोहळ्याचे उत्पादन घेऊन यशस्वी वाटचाल सुरू केली आहे. नंदेश्वर सोनवाने असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
नंदेश्वर यांच्याकडे १४ एकर शेती असून पीढी दर पीढी त्यांच्याकडे धानशेतीच केली जायची. धानशेतीला लागवड खर्च अधिक आहे, त्या तुलनेत उत्पादन व नफा कमी येतो. यात कधी अति पाऊस पडून ओला दुष्काळ होतो तर कधी पाऊस न पडल्याने कोरडा दुष्काळ पडतो. अशातच कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना पीक बदल करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर २०१७ ला २ त्यांनी एकर शेतीत काटेकोहळाची लागवड करण्याचा निर्णय घेतला. काटेकोहळ्याला आयुर्वेदात फार महत्व आहे. यापासून आग्र्याचा लोकप्रिय पेठा मिठाई तयार होतो. शिवाय सोयाबीन वडीसारखी वडीही तयार होते. बाजारात या वस्तूनां बरीच मागणी आहे.
नंदेश्वरने नागपूर येथील नामांकित हल्दीराम या कंपनीशी काटे कोहळ्याची उचल करण्याचा करार केला. त्यामुळे बाजारपेठेत आपला माल विकला जाईल किंवा नाही याची जोखीम उरली नव्हती. नंदेश्वर हा स्वतः कृषी पदविका प्राप्त असल्याने आधुनिक तंत्रज्ञानयुक्त शेतीचा अभ्यासक होता. त्याने सिंदीपार (ता. सडक अर्जुनी) येथील चंदू शंकर लंजे या नातेवाईकाची भेट घेतली. त्यांच्या शेतात काटेकोहळ्याची लागवड केलेली होती. ते गेल्या ८ वर्षांपासून ही शेती करीत आहेत.
हेही वाचा - गोंदियातील पिंडकेपार मध्यम प्रकल्प ३६ वर्षानंतरही अपूर्णच...
नंदेश्वरने या पिकाविषयी माहिती घेतली. हे पीक वर्षातून तीनदा निघते, याची लागवड साधारणतः मे, सप्टेंबर व जानेवारी महिन्यात केली जाते. यासाठी सर्वात मोठा खर्च मल्चिंग व ठिंबक सिंचन संचाचा आहे. यासाठी २ एकराला सुमारे दीड लाख रुपयांचा खर्च येतो. कृषी विभागातर्फे ही योजना राबविल्यास मोठे अनुदान मिळते. शिवाय वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शन मिळते. सुरुवातीला नंदेश्वरला काही अडचणी आल्या. काटे कोहळयाचा आकार बघून बाजारात साधारणतः ७ ते १२ रुपये प्रति किलो भाव मिळतो. एक एकरात ३० टन च्या आसपास हा माल निघतो. तर, एकरभरात ३ महिन्यात दीड लाखाचे उत्पादन होते यासाठीचा लागवड खर्च ५० हजारांचा आहे. हे पीक एका वर्षात तीनदा निघते. म्हणजे एका एकरात एका वर्षात ३ लाखांचा नफा यातून मिळतो. धान पिकाचा विचार केल्यास वर्षातून दोनदा धानाचे पीक निघते. एकरात लागवड खर्च १० हजार आहे. तर, उत्पादन ३० हजारांचे निघते. तर, एका वर्षात २ पीक हंगामात ४० हजार रुपये नफा मिळत असल्याने पारंपरिक धान शेती ही नुकसानीची आहे.
काटे कोहळे हे दमा, खोकला व मधुमेहासारख्या विकारांवर गुणकारी असल्याने याला आयुर्वेदात महत्वाचे स्थान आहे. हे पीक ९० दिवसात येते. लागवडीनंतर ६० दिवसात याला फुले येतात. पुढील एक महिन्यात वाढ होऊन तो काढणीस प्रारंभ होतो. यावर पांढरट पावडर चढला की तो काढणीस योग्य समजला जातो. सोनवाणे यांच्या या प्रयोगामुळे गावातील ८ मजुरांना बारमाही रोजगार उपलब्ध झाला आहे. याआधी हे मजूर हंगामी मजूर म्हणून काम करायचे. त्यांना वर्षातून अनेक महिने हाताला काम नव्हते, आज मात्र त्यांच्या रोजगाराचा प्रश्न मिटलेला आहे.
हेही वाचा - ईटीव्ही भारत इम्पॅक्ट : प्रधानमंत्री मातृवंदन योजनेत गोंदिया राज्यात अव्वल