गोंदिया - देशात एकीकडे स्वातंत्र्याचा ७५वा अमृत महोत्सव संपूर्ण देशात साजरा होत असताना गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील चांडक कुटूंबियांनी आपल्या घरातील गणेशोत्सवाचे ७५ वे वर्ष अनोख्या पद्धतीने सजावट करून देशाला समर्पित केले आहे. या कुटुंबातर्फे स्वातंत्र्यसाठी बलिदान देणाऱ्या थोर हुतात्म्यांची आठवण करून देणारा देखावा तयार करण्यात आला आहे.
स्वातंत्र्याप्रमाणे गणशोत्सवाचाही अमृत महोत्सव -
गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव येथील रमणलाल चांडक यांच्या कुटूंबात १९४७ पासून गणेशोत्सव साजरा केला जात आहे. आज रमणलाल चांडक आणि यांचा घरात साजरा होणारा गणेशोत्सवानेदेखील ७५ व्या वर्षात पदार्पण केल्याने तसेच या वर्षी संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असल्याने, ज्या थोर हुतात्म्यांनी देशासाठी आपले बलिदान देत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, अश्या थोर पुरुषांच्या बलिदानाला आठवण करून देणारा देखावा चांडक कुटूंबियांनी गणेशोत्सवादरम्यान साकारलेला आहे. यात देशाचा मान उंचविणारा तिरंगा, देशाचा नकाशा, दिल्ली येथील लाल किल्याची झलक, ज्या थोर हुतात्म्यांनी आपले बलिदान दिले अश्या महापुरुषाचे तैलचित्र, तसेच त्यांच्या घरात आतापर्यंत साजरे करण्यात आलेल्या गणेश उत्सवाचे छयाचित्र, अश्या अनेक देखाव्याच्या माध्यमातून या गणेश उत्सवाला अमृत गणेशोत्सवाप्रमाणे दाखविलेला आहे. तर हा अनोखा देखावा चांडक कुटूंबियांनी स्वतः साकारला असून त्यांच्या अनोख्या उपक्रमाची चर्चा सध्या गोंदिया जिल्ह्यात सुरु आहे. याआधी देखील चांडक कुटूंबियांनी अनोखा सामाजिक संदेश देणारे देखावे गणेशोत्सवादरम्यान साकारले आहेत.