गोंदिया - पोलिसांचा घातपात करण्याच्या उद्देशाने कोसबी जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी स्फोटक साहित्य पेरून ठेवले होते. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे शोध घेऊन ही स्फोटके निकामी करण्यात आली आहेत. देवरी तालुक्यातील चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत हा जंगल परिसर येतो. पोलिसांच्या या कारवाईमुळे होणारा मोठा अपघात टळला.
पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या नेत्वाखाली देवरी येथील सी ६० कमांडो पथक, बीडीडीएस नक्षल मोहीम सेल व पोलीस स्थानक चिंचगड येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोसबी जंगल परिसरात शोध मोहीम राबवली. त्यांना काही संशयित वस्तू आढळून आल्या. त्यानंतर बीडीडीएस पथकाच्या साहाय्याने खबरदारीच्या उपाययोजना करून पाहणी केली. त्या ठिकाणी नक्षलवाद्यांनी घातपात घडवून आणण्यासाठी स्फोटके पुरल्याचे दिसून आले. त्यानंतर पथकाने सावधानता बाळगता स्फोटके निकामी केली. त्यामधून निळ्या रंगाचे प्लास्टिक ड्रम, पिवळ्या व पांढऱ्या रंगाची इलेक्ट्रिक बॅटरी, प्रेशर कूकर, नक्षली पत्रके, इलेक्ट्रिक वायर काळ्या रंगाचे टेप, इलेक्ट्रिक पिन असे स्फोटक साहित्य मिळाले. हे साहित्य जप्त करण्यात आले असून नक्षलवाद्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हेही वाचा - भोपाळ : वडिलांसोबत ल्युडो खेळात हरल्यानंतर तरुणीची कौटुंबिक न्यायालयात धाव