गोंदिया - पुरोगामी महाराष्ट्राला लाजविणारी घटना गोंदिया जिल्ह्यात घडली आहे. प्रेम प्रकरणातून दुसऱ्या समाजाच्या मुलीशी लग्न करून आपल्या घरी नांदायला घेऊन आणणे एका प्रियकराला महागात पडले आहे. कतिया समाजाच्या लोकांनी त्यांना बहिष्कृत करत वाळीत टाकले आहे. इतकेच नव्हे तर दंडरुपाने 1 लाख रुपये किंवा 50 हजार रूपये भरण्याचे फर्मान काढले आहे. विशेष म्हणजे गृहमंत्री आणि गोंदियाचे पालकमंत्री अनिल देशमुख यांच्या जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे.
मदत करणाऱ्यासही मारहाण
गोंदिया तालुक्यातील जरताळ येथील गुलाब रमेश अजितवार हे कतिया समाजाचे असून यांनी प्रेम प्रकरणातून कुणबी समाजाच्या ज्योती अजितवार-शेंडे हिच्याशी नागपूर येथे 17 ऑक्टोबर 2020ला विवाह केला. विवाहानंतर 9 डिंसेबर 2020ला ते आपल्या गावात परत आले. त्यानंतर 15 डिसेंबरला दुसऱ्या जातीच्या मुलीशी लग्न केले, म्हणून गावात शिक्षेसाठी कतिया समाजाची बैठक झाली. यात दंडरुपात 1 लाख ते 50 हजार रुपये दंडाची रक्कम बोलली गेली. मात्र आपण गरीब असल्याने केवळ एक हजार रुपये भरू शकत असल्याचे पीडित गुलाबकडून सांगण्यात आले. यात गुलाब याला मदत करून आता आंतरजातीय विवाह करणे ही प्रथा सुरुच असून केवळ 50 रूपयेच दंड घेऊन जाऊ दया, असे म्हणत गुलाब यांना मदत करणाऱ्या मनोज अजितवार या व्यक्तीलाही मारहाण करण्यात आली.
लहान मुलांनाही नाकारला प्रवेश
अखेर पैसे भरू न शकल्यामुळे पीडित गुलाब अजितवार यांच्या कुटुंबाला कतिया समाजाने बहिष्कृत केले. एवढेच नव्हे तर त्यांच्या लहान मुलांनाही आपल्या घरी प्रवेश नकारण्यात आला आहे. याप्रकरणी गुलाब यांचा मित्र मनोज अजितवार यांच्या तक्रारीवरून 3 व्यक्तींवर भादंवि कलम 324, 504, 34 अन्वये गंगाझरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.