गोंदिया - आमगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत खुर्शीपारटोला येथे प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये नावाची दुरूस्ती करण्याकरीता तसेच हफ्ता बँक खात्यात जमा करण्याकरीता ग्रामीण गृहनिर्माण अभियंता (कंत्राटी) यांनी चार हजार रूपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. पंकज श्रीराम चव्हाण,( २८ वर्षे )असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
सन २०१९ - २० आर्थिक वर्षात ग्रामपंचायत खुर्शीपारटोला अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये त्यांचे चुकीचे नाव समाविष्ट करण्यात आले होते. त्यावरून ऑनलाईन यादी तपासली असता, त्या यादीत त्यांच्या नावा ऐवजी त्यांच्या मुलाचे नाव नोंदविल्याचे निदर्शनास आले. त्यावरून त्यांनी माहे जानेवारी २०२१ मध्ये चव्हाण कनिष्ठ अभियंता, पंचायत समिती आमगाव यांची भेट घेवुन आँनलाईन यादी मध्ये त्यांच्या नावाची दुरूस्ती करून पहिली किश्त जमा करण्याची विनंती केली. त्यावेळी चव्हाण यांनी तक्रारदाराच्या नावात दुरूस्ती करवुन बांधकामाची पहिली किश्त २० हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याकरीता त्यांच्याकडे ५ हजार रूपयांची लाच रक्कमेची मागणी केली.
दरम्यान चव्हाण यांनी तक्रारदाराच्या बँक खात्यामध्ये घरकुल बांधकामाची पहिली किश्त २० हजार रूपये जमा केली. त्यानंतर काही दिवसाने चव्हाण हे घरकुलाच्या सर्वे करिता खुर्शीपारटोला येथे गेले. त्यावेळी तक्रारदाराने त्यांना घरकुल बांधकामाची दुसऱ्या हफ्त्याबाबत विचारले असता त्यांनी म्हटले की, ऑनलाईन यादीतील नावाची दुरूस्ती करून पहिली किश्त जमा केल्याबाबतचे ५ हजार रूपये तुम्ही आतापर्यंत दिले नाहीत, असे म्हटले. त्यावर तक्रारदाराने काही कमी करा अशी विनंती केली. त्यावर त्यांनी ४ हजार ५०० रूपये देवुन द्या, घरकुलाच्या बांधकामाचे फोटो माझ्याकडे आणुन दिल्यानंतर मी दुसरी किश्त सुध्दा जमा करून देतो, असे म्हणुन तक्रारदराकडे ४ हजार ५०० रूपये लाचेची मागणी केली. तक्रारदारास लाच रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी १५ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया येथे तक्रार नोंदविली.
त्यानुसार आज १७ मार्च रोजी पंचायत समिती आमगाव येथे लाचलूचपत विभागाने सापळा रचत कार्यवाही करण्यात आली. असता कार्यवाही दरम्यान आरोपी. पंकज श्रीराम चव्हाण, २८ वर्षे, पद - ग्रामीण गृहनिर्माण अभियंता (कंत्राटी), पंचायत समिती कार्यालय आमगाव, यांनी आपल्या इतर लोकसेवक पदाचा दुरूपयोग करून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाच्या ऑनलाईन यादीमध्ये तक्रारदाराच्या नावात दुरूस्ती करण्यासाठी, घरकुल बांधकामाची पहिली किश्त बँक खात्यात जमा केल्याचा मोबदला म्हणून व दुसरी किश्त ४५ हजार रूपये तक्रारदाराच्या बँक खात्यात जमा करण्याकरीता तक्रारदाराकडे तडजोडी अंती ४ हजार रूपये लाच रकमेची मागणी करून ती पंचासमक्ष स्वीकारली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.