गोंदिया - ग्राझिया टुलीवो लाईफस्टाईल प्रायव्हेट कंपनीला (स्टील प्लांट) आज (गुरुवारी) दुपारी एक वाजता आग लागली असून यामध्ये सात कामगार भाजले आहेत.
देवरी येथील एमआयडीसीमध्ये गेल्या काही महिन्यांपूर्वीच ग्राझिया टुलीवो लाईफस्टाईल प्रायव्हेट कंपनीचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले होते. प्राथमिक माहितीनुसार काम सुरू असताना वितळलेल्या लोखंडाचे द्रव्य कामगारांच्या अंगावर पडले. दुपारी 1 वाजताच्या सुमारास कामावर असलेल्या सात कामगार आगीने भाजल्याची घटना घडली आहे. जखमी कामगारांमध्ये बिरबल, अजित सोनटक्के, पंचदेवराव, सुनिल कुमार राव, यादव, अरशद अन्सारी हे सर्व 90 टक्क्यांच्यावर भाजले गेले आहेत. यापैकी तिघांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय व उर्वरित जखमींना गोंदिया वैद्यकिय महाविद्यालयात हलविण्यात आले आहेत. यासंदर्भात तेथील सुरक्षारक्षक काहीही बोलायला तयार नसल्याने सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही.