गोंदिया - चीनमधील कोरोना विषाणूच्या बळींची संख्या दिवसेंदिवस अधिक वेगाने वाढत चालली आहे. या विषाणूच्या संसर्गाचा धोका असलेल्या ३० देशांमध्ये भारताचा ही समावेश आहे. चीनमध्ये गोंदिया येथील सोनाली भोयर ही तरुणी शिक्षण घेत आहे. कोरोना या विषाणूमुळे तिचे पालक चिंतेत आहेत. तसेच तिला सुखरुप भारतात परत आणावे, अशी मागणी करत आहेत. या तरुणीसह शिक्षणासाठी गेलेले राज्यातील एकूण सात तरुण-तरुणी चीनमध्ये अडकले आहेत.
सोनाली दयाराम भोयर (ता. आमगाव, जि. गोंदिया) ही चीन येथे वुहान शहर लगतच्या हुबे युनिव्हर्सिटीत एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. कोरोना या विषाणूमुळे आतापर्यंत 170 च्या वर लोकांचा जीव गेला आहे. चीन सरकारने सध्या या हुबे युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना कॅम्पस बाहेर पडण्यास मनाई केली आहे. भारतातून शिक्षण घेत असलेल्या तरुण-तरुणींना तेथील हॉस्टेलमध्ये देण्यात येत असलेल्या खाद्याची सवय नसल्याने या विद्यार्थ्यांना स्वदेशातून काही खाद्य सामग्री पाठवण्यात आली होती. मात्र, ती देखील संपत आल्याने येथे अडकलेल्या तरुण-तरुणीचे हाल झाले आहेत. याप्रकारामुळे सोनाली हिचे पालकही चिंतेत आहेत. म्हणून त्यांनी भारत सरकारकडे या सर्वांना सुखरुप परत आणावे, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, सातही जणांनी घरच्यांशी संपर्क साधला आहे. तसेच भारतीय दुतावासाशी संपर्क साधून मदतीची मागणी केली आहे.
चीनमध्ये अडकलेल्या राज्यातील 7 जणांची नावे -
- सलोमी त्रिभुवन- पुणे
- जयदीप देवकाटे- पिंपरी चिचवड
- आशिष गुरमे - लातुर
- प्राची भालेराव - यवतमाळ
- भाग्यश्री उके - भद्रावती,जि.चंद्रपूर
- सोनाली भोयर - रा. सध्या गोंदिया (मूळ गाव - गडचिरोली)
- कोमल जल्देवार - नांदेड