गोंदिया - आमगाव तालुक्यातील ठाणा-कोसमटोला या रस्ताचे ७४ लाख रुपये खर्चून बांधकाम हाती घेण्यात आले. वनविभागाच्या जागेत खोदकाम झाल्याने वनपाल जी. आय. लांजेवार यांनी जेसीबीने सुरू असलेले खोदकाम बंद पाडून शासकीय पंचनामा केला. तसेच त्या पंचनाम्यावर रस्त्याशेजारी शेती असलेला शेतकरी गजानन बिसेन यांच्यासह इतरांच्या स्वाक्षरी घेण्यात आल्या. यावेळी नायब तहसिलदार देखील हजर होते. मात्र, यावेळी कंत्राटदार परमार आणि अभियंता कापगते यांनी बिसेन यांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली, असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच त्यांच्याविरोधात आमगाव पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
रस्ता दुरुस्तीच्या सुरुवातीच्या कामापासूनच नागरिकांनी अंदाजपत्रकात व फलकावर दाखविल्यानुसार योग्य साहित्य वापरण्याची मागणी केली. ती मागणी करणारे ठाणा येथील शेतकरी गजानन बिसेन आहेत. कंत्राटदार परमार व या कामाचे पाहणी करणारे उपअभियंता कापगते यांनी १६ मार्चला रस्ता बांधकामाच्या पाहणी वेळी कामात अडथळा निर्माण केल्यास गोंदियात पाय ठेवू देणार नाही, अशा प्रकारची धमकी दिल्याचा आरोप शेतकरी बिसेन यांनी केला. त्याविरोधात त्यांनी आमगाव पोलिसात तक्रार देखील दिली आहे.
अधिकाऱ्यांनीही कंत्राटदाराची बाजू घेण्यापेक्षा कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष देणे महत्वाचे असताना नागरिकांच्या तक्रारीला केराची टोपली दाखविण्याचा प्रकार याठिकाणी घडला. संबंधित रस्त्याचे काम ५ प्रकियेत करायचे होते. त्यामध्ये पहिला रस्ता खोदणे व त्यावर मातीकाम करणे, त्यानंतर पाणी घालून रोलरने दाबणे, खडीकरण करून मुरुमाचा थर देणे अशाप्रकारे रस्त्याचे बांधकाम करायचे होते. पुन्हा खडीकरण त्यानंतर डाबंरीकरण करून काम करायचे होते. रस्त्याची बाजू भरण्यासाठी वनविभागाच्या क्षेत्रात जेसीबीने खोदकाम करून माती घालण्यात आली. त्यामुळे मुळासह झाडे उपटली. त्यामुळे शेतकरी गजानन बिसेन यांनी आमगाव येथील तहसिलदारासह वनविभागाचे अधिकारी व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या संबधितांना माहिती दिली. त्याआधारे १६ मार्चला संबंधित रस्त्याची पाहणी करीत असताना कंत्राटदार परमार व उपअभियंता यांनी शेतकरी बिसेन यांना शिवीगाळ करीत मारण्याची धमकी दिल्याचा आरोप शेतकऱ्यानी केला आहे. यावरून कंत्राटदाराची मुजोरी समोर आली आहे.