गोंदिया - वीज वितरण कंपनीने लॉकडाउनच्या काळातील ४ महिन्यांचे भरमसाठ वीज बिल पाठवून ग्राहकांना शॉक दिला आहे. ग्राहकांची ओरड वाढल्याने वीज वितरण कंपनीने २ टक्के कपात करण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र २ टक्के नव्हे, तर संपूर्ण १०० टक्के वीजबिल माफ करण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केली. यासाठी वीज वितरण कंपनीच्या धोरणाचा निषेध नोंदवत शहरातील राजलक्ष्मी चौकात विद्युत बिलांची होळी करण्यात आली.
![gondia](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-gon-03july-holiofelectricitybill-7204243_04072020172044_0407f_1593863444_57.jpg)
भाकप कार्यकर्त्यांनी उर्जामंत्र्यांच्या धोरणाचा यावेळी निषेध नोंदवला. तसेच विज वितरण कंपनीने ग्राहकांची ओरड वाढल्यानंतर ग्राहकांना २ टक्के सूट देण्याच्या निर्णयाची घोषणा करून ग्राहकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. याचा सुद्धा यावेळी निषेध नोंदवण्यात आला आहे.
कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे ४ महिने सर्वच व्यवहार ठप्प होते. परिणामी अनेकांचा रोजगार बुडाला तर हजारो नागरिकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाले आहेत. तरीही शासनाने या सर्व गोष्टींचा विचार करण्याऐवजी ग्राहकांना अतिरिक्त वीजबिल पाठवून शॉक देण्याचे काम केले आहे. ग्राहकांचे वीजबिल १०० टक्के माफ करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. उर्जा विभाग व शासनाच्या धोरणाचा यावेळी निषेध नोंदवण्यात आला. यानंतर विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी राहुल खांडेभराड यांना देण्यात आले.