गोंदिया - जिल्ह्यातील देवरी तालुक्यांतर्गत येत असलेल्या शिरपूर देवरीच्या सीमा तपासणी नाक्यावरून तक्रारदाराचा ट्रक सोडण्यासाठी 300 रुपयांची लाच मागण्यात आली. तडजोडीअंती 200 रुपयांची लाच रक्कम मिळविण्याचा प्रयत्न करणार्या खासगी व्यक्तीविरुद्ध देवरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील तक्रारदार हे ट्रक चालक असून ते नियमित अकोला ते रायपूर तांदूळ वाहतूक करतात. सीमा तपासणी नाका शिरपूर देवरी येथील परिवहन अधिकारी व कर्मचारी गाडी पुढे सोडण्यासाठी 300 ते 500 रुपयांची मागणी करतात, अशी तक्रार त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे शुक्रवारी 29 जानेवारी रोजी केली.
दरम्यान, लाच रकमेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली. यात शिरपूर देवरीच्या सीमा तपासणी नाका येथे हजर असलेल्या आरोपी अब्दुल सलीम वल्द अब्दुल हबिब शेख (वय 37 रा. प्लॉट क्रमांक 49, दसरा रस्ता, ताज डेकोरेशन समोर, भुतिया दरवाजा महाल, नागपूर) याने आपल्या वैयक्तिक प्रभावाचा बेकायदेशीर वापर करून तक्रारदाराचा ट्रक सीमा तपासणी नाका शिरपूर देवरी येथून सोडण्याकरिता तक्रारदाराकडे 300 रुपये लाच रकमेची मागणी केली. तसेच तडजोडीअंती पंचासमक्ष 200 रुपयांची लाच रक्कम प्राप्त करण्याचा प्रयत्न केला.
त्यावरून आरोपीविरुद्ध देवरी पोलीस ठाण्यात कलम 7 ए, लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 1988 (सुधारित अधिनियम 2018) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचे पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अपर पोलीस अधीक्षक राजेश दुद्दलवार, गोंदियाचे पोलीस उपअधीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, पोलीस हवालदार दिनेश शिवले, पोलीस शिपाई सारंग बालपांडे, मंगेश कळंबे आदींनी केली.