गोंदिया - रक्तदानाचे महत्व पटवून देण्यासाठी जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील फुलेनगर जिल्हा परिषद शाळेतील स्नेहसंमेलनात रक्तदार शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा आगळावेगळा उपक्रम शाळेतील किशोर डोंगरवार या शिक्षकाने राबविला असून याला गावकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. या शिबिरात तालुक्यातील ५० च्या वर शिक्षकांनी रक्तदान केले, तर यामध्ये १० महिला शिक्षकांसह महिलांनीही रक्तदान केले.
आदर्श शिक्षक अशी ओळख असलेल्या किशोर डोंगरवार ज्या गावात शिक्षक म्हणून सेवा द्यायला जातात, त्या गावातील शाळेला आदर्श शाळा बनवितात. फुलेनगर गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांची नियुक्ती झाली आणि इथेही त्यांनी स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे ठरविले.
हेही वाचा - पूर्वीच्या सरकारने पोलीस पाटलांच्या मानधनाबाबत केवळ घोषणाच केली - गृहमंत्री
तीनशे लोकसंख्या असलेल्या फुलेनगर गावातील जिल्हा परिषद शाळेत २४ विद्यार्थी शिक्षण घेतात. मग शहरी भागाप्रमाणे आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणासह स्नेहसंमलेनाचा आनंद घेता यावा, यासाठी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. सोबतच सामाजिक बांधिलकी देखील जपली जावी या दृष्टीकोनातून गावात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये किशोर यांचे सहकारी शिक्षक देखील मोठ्या संख्येत रक्तदान करायला शाळेत पोहोचले. यासोबतच गावकऱ्यांनी देखील सहभाग नोंदवत रक्तदान करायला सुरुवात केली. तर, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावत नोकरी करणाऱ्या महिला शिक्षिकांसह गावातील महिलांनी देखील रक्तदान करत या उपक्रमासाठी शिक्षक किशोर यांचे आभार मानले.
हेही वाचा - हिरवळीचे वान, सौभाग्याची शान..! पर्यावरण संरक्षणासाठी गोंदियात '16 श्रृंगार' कार्यक्रम