गोंदिया - गोरेगाव वनक्षेत्रांतर्गत तिल्ली-मोहगाव परिसरात 4 जानेवारी रोजी आणखी एका बिबट्याचा मृतदेह आढळला. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. 3 जानेवारी रोजी मिळालेल्या बिबट्याच्या मृतदेहापासुन अवघ्या 50 मीटरच्या अंतरावर मिळाला आहे. या बिबट्याचेही दोन्ही पजे, व डोके कापलेले आहे. यापुर्वी 3 जानेवारीला एका शेतातील विहिरीत बिबट्याचे डोके व दोन्ही पंजे नसलेला मृतदेह आढळला होता. याची माहिती एका अज्ञात व्यक्तीने वनविभागाला दिली होती. त्यानंतर सोमवारी त्या परिसरात शोध मोहिम राबवली असता आणखी एक बिबट त्याच अवस्थेत सापडला. तसेच त्या परिसरात निलगायीचे कापलेले डोकेच मिळाले असुन शिकार करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच जादुटोणा केल्याचा प्रकारही बोले जात आहे.
शिकारीच्या घटनांमध्ये वाढ
गोंदिया जिल्ह्यातील जंगलांना संरक्षित वनक्षेत्राचा दर्जा मिळाल्यानंतर गेल्या काही वर्षात वन्यजीवांची संख्या वाढली आहे. त्यामुळे शिकार करण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. तसेच 1 महिन्यापुर्वी गोंदिया वनपरिक्षेत्रांतर्गत चुटिया-लोधीटोलाच्या एका शेत शिवारात वाघाची शिकार करण्यात आली होती. त्याचेही तुकडे करून परिसरात फेकण्यात आले होते. यामुळे आता वन विभागाने शिकारीवर लगाम लावण्यासाठी कठोर कारवाई करण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात वन्यजीवांची शिकार मोठ्या प्रमाणावर होऊ शकते. तसेच बिबट्याचे मृतदेह शवविच्छेदन करून पुढील तपास उपवन संरक्षक कुलराज सिंग, सहायक वन संरक्षक एस. एस सदगीर, मानद वन्य जीववनरक्षक मुकुंद धुर्वे यांच्या मार्गदर्शनात गोरेगावचे वन परिक्षेत्र अधिकारी प्रविण साठवणे करत आहेत.
हेही वाचा - मुंबईतील नाईट कर्फ्यू आज हटवणार