गोंदिया - विरोधक 'ईव्हीएम'च्या विरोधात असेलेले आंदोलन म्हणजे त्यांनी आपली हार मान्य केली आहे. तसेच ते या आंदोलनाच्या माध्यमातून 'कव्हर फायरिंग' करत जनतेची दिशाभूल करत आहेत, अशी जोरदार टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली. विरोधकांचा २१ ऑगस्ट रोजी 'ईव्हीएम' विरोधात महामोर्चा निघणार आहे. मात्र, या महामोर्चानंतरही त्यांचा महापराभवच होणार आहे, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावला. मुख्यंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा आज चौथा दिवस आहे. त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते येथे बोलत होते.
तसेच भाजप व शिवसेना मध्ये येणाऱ्या विधानसभा मध्ये युती होणार असल्याचे त्यांना पुन्हा एकदा स्पष्ट करत गोंदिया विधानसभेची जागा भाजपच्या वाट्याला आली आहे, असेही त्यांनी सांगितले. गोंदिया जिल्ल्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, प्रथम आमच्या सरकारच्या अजेंड्यावर हा जिल्हा आला. आणि त्यानतंर ग्रामसडक व इतर योजनेच्या माध्यमातून जिल्ह्याला अनुदान दिले आहे. तसेच जिल्ह्यातील दुग्ध व्यवसाय वाढविण्यासाठी प्रयत्न करु व त्याचबरोबर रखडले प्रकल्पही सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्रातील पहिला बायोगॅस प्रकल्प भंडारा जिल्ह्यातील मकरदोगडा येथे तयार करणार आहे. गेल्यावेळी आम्ही ज्याप्रमाणे धानाला 500 रुपये बोनस दिला तसेच येत्या वेळेसही देऊ, असे आश्वासनही त्यांनी केले. त्याचबरोबर एकूण कामे जर पाहिली तर रस्ते , मुख्यंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून, मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारने लक्षणीय कामे केली. एकूण आकडेवारी पाहिली तर आधीच्या सरकारपेक्षा दुपटीने काम केली आहेत.
लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले होती की संपूर्ण देश हा सत्ताविरोधी नसून त्यांच्या बाजूने आहे. तर तीच परिस्थिती आज राज्यात निर्माण झाली आहे. जनतेची मानसिकता बनलेली असून मोदीजींना साथ देणार सरकार त्यांना राज्यातही आणायचे, असे जनतेने ठरवलेले आहे. आणि जनता आम्हांला पुन्हा संधी देणार असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
केंद्र सरकारने खुल्या प्रवर्गाला दिलेल्या १० टक्के आरक्षणाच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, ज्यांना इतर ठिकाणी आरक्षण देण्यात आले आहे, त्यांना यामध्ये आरक्षण दिले जाणार नाही. तर राज्य सरकारने खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना तब्बल ६०४ कोर्सेसमध्ये ५० टक्के सवलत दिली. त्याचसोबत या प्रवर्गातील विदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती दिली. आणि यामुळे कोणत्याच आरक्षणाला धक्का बसणार नाही.
मुंबईत होणाऱ्या पावसामुळे होणाऱ्या समस्येच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, यासाठी मुंबईत ८ पंपिंग स्टेशन बनवण्यात आले आहेत. त्यापैकी ५ पंपिंग स्टेशन सुरु झाली आहेत तर ३ पंपिंग स्टेशनवर काम सुरु आहे. यांच्या काम पूर्ण झाल्यावर ही परिस्थिती मुंबई शहरात उद्भवणार नाही, असा दावाही मुख्यमत्र्यांनी यावेळी येथे केला.