गोंदिया - येत्या 11 जुलै रोजी गोंदिया जिल्हा परिषदेंतर्गंत येणाऱ्या सर्व पंचायत समिती आणि 14 जुलैला जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यातच सध्या कोव्हिड-19 मुळे राज्यातील निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्हा परिषदांचा कार्यभार सुरळीत चालविण्यासाठी प्रशासक नेमण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने काढले आहेत.
जिल्हा परिषद, पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कलम 91-ब व 75-ब च्या कलमांचा वापर करीत जिल्हा परिषद अधिकारांचा वापर करण्यासाठी व कर्त्यव्य पार पाडण्यासाठी प्राधिकृत अधिकारी (प्रशासक) म्हणून अधिकार देण्याचे आदेश ग्रामविकास विभागाचे उपसचिव एकनाथ गागरे यांनी दिले आहेत. या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी पुढील आदेशापर्यंत प्रशासक म्हणून कार्य करण्याचे आदेश 8 जुलै ग्रामविकास विभागाकडून देण्यात आले आहेत.