गोंदिया- जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यांतर्गत येत असलेल्या इटियाडोह मुख्य कालव्यात बुडून एका युवकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना काल (४ सप्टेंबर) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. चेतन श्रावण ठाकरे (वय २५ रा. कराड वैरागड) असे मृत युवकाचे नाव आहे.
आरमोरी तालुक्यातील कराड वैरागड येथील १५ तरुण वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी इटियाडोहला आले होते. पार्टी संपल्यावर चेतन हा कालव्याच्या काठावर पार्टीसाठी आणलेली भांडी धुवत होता. या दरम्यान त्याचा तोल जाऊन तो कालव्यात पडला व त्याचा बुडून मृत्यू झाला.
याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चेतनचा मृतदेह कालव्या बाहेर काढला. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अर्जुनी मोरगाव येथील रुग्णालयात पाठवला. उत्तरीय तपासणी नंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक ठाणेदार बी.यस. मुंडे करीत आहेत.
हेही वाचा- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात जंतुनाशक फवारणी