गोंदिया - अंधश्रध्दा हा विषय मागील अनेक वर्षांपासून शासन व सामाजिकस्तरावर चर्चिला जात आहे. अनेक लोक आमिषाला बळी पडतात. हे मागील काही वर्षांपासून देशात अनेक ठिकाणी पहावयास मिळत आहे. अश्यातच गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यामधील सीतेपार गावात अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन, बेकायदेशीर पंचायत भरविण्यात आली.व टिकाराम पारधी या शेतकऱ्याकडून २१ हजार रुपयांचा दंड ठोठाविण्यात आला. या प्रकरणी सीतेपार गावातील सरपंच व अन्य नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![अंधश्रध्देच्या आहारी गाव](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-gon-17june21-gaharipanchayatadiedofsuperstition-10040_17062021173418_1706f_1623931458_727.jpg)
जिल्हाधिकारी व आमगाव पोलीस स्टेशनला कारवाही करण्याची मागणी
सीतेपार गावातील शेतकरी टिकाराम पारधी हे जेसीबी ने शेतीच्या सपाटीकरणाचे काम करीत होते. त्यांच्या शेतात मध्यभागी भिवसन नावाचा देव असलेला दगड पारधी यांनी काढून बांधावर ठेवल्याची माहीती गावकऱ्यांना मिळाली. गावकऱ्यांनी त्याचे काम बंद करून तू आमच्या देवाचा अपमान केलास, असे बोलून १२ जून रोजी गावपंचायत बोलवली गेली. या पंचायतीला सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष व प्रतिष्ठित नागरिक असे जवळपास दीडशे नागरिक उपस्थित होते. पंचांनी २१ हजार दंड भरावा लावेल व दंड न भरल्यास गावातून बहिष्कृत करण्यात येईल. असे सांगण्यात आले. बेकायदेशीर गावपंचायतीच्या माध्यमातून दंड ठोठावणांऱ्यावर कारवाही करण्यात यावी अशी मागणी अंनिसने, जिल्हाधिकारी व आमगाव पोलीस स्टेशनला केली.
तक्रार दाखल
पोलिसांनी चौकशी केली असता, अखेर टिकाराम पारधी यांनी १६ जूनच्या रात्री तक्रार दाखल केली. फिर्यादीच्या तक्रारी वरून पुरणलाल बिसेन, उल्हासराव बिसेन पोलीस पाटील, योगेश बिसेन, यादोराव बिसेन, प्रताप बिसेन, राजेंद्र बिसेन (तंटामुक्ती अध्यक्ष) गोपाल मेश्राम (सरपंच) सुधीर बिसेन, टेकचंद मडावी या नऊ जणांवर भारतीय दंड विधान १८६० अंतर्गत १४३, ३४१, ५०४, ५०६, तसेच सामाजिक बहिष्कार प्रतिबंध व निवारण कायदा, अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास नाळे व कॉन्स्टेबल बलराज लांजेवार करीत आहेत.