गोंदिया - मध्यप्रदेशच्या बालाघाटमध्ये पोलिसांनी तब्बल 5 कोटींच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. यामध्ये 10 रुपयांपासून 2000 रुपयांपर्यंत सर्व चलनाच्या बनावट नोटा असल्याचे दिसून आले. या प्रकरणी 8 जणांना अटक करण्यात आली असून मध्यप्रदेशातील बालाघाट आणि महाराष्ट्रातील गोंदिया भागात या बनावट नोटा खपवल्या जात असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.
गोंदिया पोलीस आणि बालाघाट पोलिसांनी सयुक्तरित्या ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या 8 आरोपींपैकी 6 बालाघाटचे, तर 2 गोंदियाचे रहिवासी असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा - अनिल देशमुखांवरील ईडीची कारवाई राजकीय हेतूने - नवाब मलिक
अशी झाली कारवाई
मध्यप्रदेशमधील बालाघाट पोलिसांना बनावट नोटांचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची टीप सुत्रांकडून मिळाली होती. याबाबत पोलिसांनी तपास केल्यानंतर बालाघाट आणि गोंदिया या भागांत हे रॅकेट कार्यरत असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी गुप्त मोहीम राबवत एका आरोपीला 8 लाख रुपयांच्या बनावट नोटांसह अटक केली. त्याला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने बालाघाट आणि गोंदियातील ठिकाणांची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर गोंदिया पोलिसांशी संपर्क साधून बालाघाट पोलिसांनी 8 जणांना अटक केली.
मार्च महिन्यातही पकडले होते रॅकेट
पोलिसांनी या वर्षीच्या मार्च महिन्यातही बनावट नोटा खपवण्याच्या तयारीत असलेल्या चार जणांना अटक करून त्यांच्याकडून 4 लाख 94 हजारांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या होत्या. आताच्या 5 कोटींच्या बनावट नोटांच्या प्रकरणाचा त्या प्रकरणाशी संबंध असल्याचा संशय पोलिसांना असून पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत.
सर्व चलनातील बनावट नोटा
पोलिसांनी जप्त केलेल्या नोटांमध्ये 10 रुपयांच्या नोटेपासून ते अगदी 2 हजार रुपयांच्या नोटेपर्यंत सर्व चलनाच्या बनावट नोटा आहेत. यामध्ये 2 हजार रुपयांच्या नोटांची संख्या अधिक असून यासाठी कलर प्रिंटर किंवा स्कॅनरचा वापर करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे.
बनावट नोटांचे नक्षल कनेक्शन
या नोटांचा वापर नक्षलवाद पसरवण्यासाठी केला जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. बालाघाट जिल्ह्यातील किरनापूर आणि गोंदिया या भागांत या प्रकरणाचे अनेक धागेदोरे मिळण्याची शक्यता असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आतापर्यंत मध्यप्रदेशात झालेली बनावट नोटांविरुद्धचीही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
हेही वाचा - आदिवासी अनाथ मुलींचे नाथ बनले जिल्हाधिकाऱ्यांसह राज्याचे २० अधिकारी