गोंदिया - पोलीस अधिकारी आणि कर्मचारी नियमीतपणे गोंदिया तालुक्यात गस्तीवर असताना. दरम्यान त्यांना बघून एका बोलेरो चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगात पळविले. पोलिसांना संशय आल्याने त्याचा पाठलाग करून त्याची गाडी अडवत तपासणी केली असता वाहनात तब्बल ३३.५०२ किलोचा गांजा आढळून आला. पोलिसांनी याप्रकरणी वाहनांसह ५ लाख २८ हजार ७५१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी शासकीय वाहनाने गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बटाणा, बरबसपुराकडे जात होते. दरम्यान गोंडीटोला जवळ पोलीस वाहनाकडे बघून सिल्व्हर रंगाच्या महिंद्रा बोलेरो (एमएच २९, एल. ०२६५) वाहन चालकाने वाहन वेगात चालवून पळ काढण्याचा प्रयत्न केला. हे बघून पोलीस पथकाला वाहनचालकावर संशय आला. त्यांनी महिंद्रा बोलेरो वाहनाचा पाठलाग केला. ते वाहन अडवून वाहनाची तपासणी केली. वाहनाच्या मागील सिटवर हिरवी, पिवळी आणि पांढऱ्या रंगाच्या एकूण तीन प्लॅस्टिकच्या पोती आढळून आल्या. त्या पोत्यांबाबत चालक चैनलाल नेतलाल बोपचे (वय ३६ वर्षे, रा. नक्सी जि. बालाघाट, मध्य प्रदेश) याची चौकशी केली असता तिन्ही पोत्यांमध्ये गांजा असल्याचे कबूल केले. पोलिसांनी तिन्ही पोत्यांमधून ३३ किलो ५०२ ग्रॅम वजनाचा गांज्याचे पंचासमक्ष पंचनामा करून जप्त केले. जप्त केलेल्या गांजाची किंमत २ लाख १७ हजार ७५९ रुपये आहे. त्यांच्याकडून मोबाईल, वाहन आणि गांजा असा एकूण ५ लाख २८ हजार ७५९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.