गोंदिया- आदिवासी व नक्षलग्रस्त देवरीत राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत १६ जिल्ह्यातील हजारो धावपटू सहभागी झाले होते. देवरीसारख्या दुर्गम नक्षलग्रस्त भागात राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करणे हा सर्वांसाठी कौतुकाचा विषय होता. मागील १३ वर्षापासून येथे दरवर्षी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेतूनच आदिवासी मुलींनी मुंबईपर्यंत मजल मारत यश संपादन केले आहे.
देवरी येथील मॅरेथॉन स्पर्धा ही साधीसुधी स्पर्धा नव्हे तर, तिचा मोठा इतिहासही आहे. देवरी येथील तानबा रामाजी देशमुख यांना शालेय जीवनापासूनच धावण्याची आवड होती. त्यामुळे ते एका मॅरेथॉनमध्ये धावले. त्यानंतर ग्रामीण भागात त्यांनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करायला सुरूवात केली. तेव्हापासून तालुकास्तर ते आता राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. त्यांच्या या आयोजनामुळे देवरीसारख्या अतिमागास दुर्गम आदिवासी नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांमध्ये मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्याची गोडी निर्माण झाली आहे. आता आदिवासी विद्यार्थीही जिल्हास्तरापासून तर राज्यस्तरावर होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन यश मिळवत आहेत.
स्पर्धेमुळे अनेक आदिवासी विद्यार्थ्यांचे भविष्य बनले
मॅरेथॉन स्पर्धेतून अनेक नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे भविष्य बनले आहे. आता ते देशासाठी ऑलिंपिकमध्ये खेळण्याचे स्वप्न उराशी बाळगत आहेत. जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हा पोलीस अधिक्षक व आताचे पोलीस महासंचालक हरिष बैजल यांच्या प्रेरणेने जिल्ह्यात मॅरेथॉन स्पर्धेला नवी दिशा मिळाली. त्यांनी आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांमधील गुण हेरून त्यांना नाशिकमध्ये खास प्रशिक्षण दिले. यावरच न थांबता बैजल यांनी मुंबईतील टाटा मॅरेथॉनमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले. या स्पर्धेत वर्षा पंधरे या विद्यार्थिनीने राज्यातून तिसऱ्या क्रमांक पटकविला होता. ती आता देशासाठी खेळण्याचे स्वप्न उराशी बाळगू लागली आहे. आदिवासी भागातील या मॅरेथॉन स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यातील धावपटू सहभागी होत असताना देवरी तालुक्यातील विद्यार्थिंनींमध्ये मोठा उत्साह संचारला आहे.
हेही वाचा- गोंदियात पहिल्यांदाच पोलीस पाटलांचे विदर्भस्तरीय अधिवेशन