गडचिरोली - जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात यंदा ठिकठिकाणी रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. मात्र, काही कंत्राटदारांनी निकृष्ट दर्जाचे बांधकाम व डांबरीकरण केल्यामुळे एका आठवड्यातच डांबरीकरण निघून माती दिसायला लागली आहे. तसेच अनेक ठिकाणी खड्डे देखील पडले आहे. त्यामुळे शासनाचे करोडो रुपये, खड्ड्यात गेले की, कोणाकोणाच्या खिशात गेले? असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहे. तसेच याची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
एका कंत्राटदाराने कामाचे लाखो रुपये लाटल्याप्रकरणी त्याच्यासह अन्य दोन अभियंत्यावर पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे आतातरी इतर कंत्राटदार सुधरतील असे वाटत होते. मात्र, सध्या समोर आलेल्या निकृष्ट दर्जाचे बांधकाम पाहता त्यांच्यावर काहीही परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. भामरागडमध्ये यंदा ठिकठिकाणी रस्त्यांचे दर्जेदार काम करण्याचे ठरले होते. त्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत बोटनफुंडी-ताडगाव-मन्नेराजाराम-बामनपल्ली या 38 किमी रस्त्यांच्या काम एका कंत्राटदाराला देण्यात आले. याच कामात स्लॅब ड्रेन-42 नग व नाली बांधकाम-1280 मीटरचा समावेश आहे. 17 कोटी 49 लाख 05 हजार 263 रुपयांच्या कामाचा कार्यारंभ आदेश गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात निघाला, तर एक वर्षासाठी या कामाची मुदत आहे. तसेच पाच वर्षे देखभाल व दुरुस्तीची हमी सुद्धा आहे.
कंत्राटदारांनी कामाचा फलक न लावताच कामाला सुरुवात केली. थातुरमातुर खोदकाम करून गिट्टी भरली. त्यावर काही ठिकाणी मुरुम, तर काही ठिकाणी माती टाकली. चक्क मातीवरच डांबरीकरण केले. ते सुद्धा अत्यल्प डांबर वापरून. केवळ 1 ते 2 इंचाचे हे डांबरीकरण एका आठवड्यातच निघाले असून तीन दिवसातच माती दिसू लागली. त्यामुळे जिंजगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सिताराम मडावी यांनी सदर कामावर आक्षेप घेतला. निघालेले डांबर परत निट करून देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले. मात्र, आता पूर्ण रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडू लागले व खड्ड्यात पाणी साचू लागले. पायी जाणाऱ्यांचे हाल होत आहेत त्याचे काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
भामरागड तालुक्यात राजकीय नेतृत्वाचा अभाव आहे. येथील बहुसंख्य आदिवासी बांधव व जनता भोळी, अशिक्षित आहे. त्यामुळे व्यापक समाजहीत लक्षात घेऊन निर्भिडपणे सदर कामाची सखोल चौकशी करावी. तसेच अभियंत्यांच्या समक्ष पुनश्च रस्ता खोदून गिट्टी, मुरूम डांबराचे पुनर्भरण करावे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
दर्जेदार काम झाल्याशिवाय कुठलेही बिले देणार नाही -
या कामाचे आदेश गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये निघाले. मात्र, हे काम यंदा जून महिन्यात करण्यात आले. डांबरीकरण निघत असल्याचे लक्षात येताच ही बाब कंत्राटदाराच्या निदर्शनास आणून दिली. कंत्राटदााने हे काम परत करून देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे दर्जेदार काम झाल्याशिवाय कुठलेही बिले देणार नाही, असे उपविभागीय अभियंता नितीन चिंतावार म्हणाले.