गडचिरोली - दारूविक्री बंद करण्यासाठी सक्रीय असलेल्या मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी बुधवारी अवैधरित्या दारूविक्री करणार्यांच्या घरी धाड टाकून देशी व गावठी दारूचा मोठा साठा जप्त केला. सिरोंचा तालुक्यातील अंकिसा व कंबालपेठा येथे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत जप्त केलेला दारूसाठा महिलांनी मुख्य चौकात आणून नष्ट केला तर इतर साहित्यांची होळी केली.
सिरोंचा तालुक्यातील अनेक गावांत अवैधरित्या दारूची विक्री होत आहे. दारू गाळण्यासाठी झाडे-झुडपे, नदी नाल्यांचा आधार घेतला जातो. अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. यावर प्रतिबंध आणण्यासाठी मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी एक बैठक घेतली. या बैठकीत शंभरावर महिला उपस्थित होत्या. गावात २६ दारूविक्रेते असल्याचे महिलांच्या चर्चेतून समोर आले. त्यानंतर, महिलांनी सर्व विक्रेत्यांच्या घरी धाड टाकण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा - खांद्यावर साहित्याची पोती अन् चिखलातून वाट तुडवत अधिकारी पोहोचले पूरग्रस्तांच्या मदतीला
सकाळपासून सुरू झालेली ही शोधमोहीम सायंकाळपर्यंत सुरू होती. या कारवाईत मोठ्या प्रमाणात गावठी व देशी दारूचा साठा महिलांना सापडला. अनेकांच्या घरी दारूच्या शेकडो रिकाम्या बाटल्याही आढळल्या. महिलांनी हा सर्व साठा गावातील चौकात जमा करून तो नष्ट केला तसेच दारूविक्री विरोधात जोरदार घोषणाही दिल्या. विक्रेत्यांविरोधात महिलांचा हा संताप पाहून सर्व गावकरी चकित झाले होते.
हेही वाचा - गडचिरोलीत सी-60 जवान-नक्षलवाद्यांमध्ये चकमक