गडचिरोली- उपविभाग जिमलगट्टा हद्दीतील किष्टापूर नाल्यावरील पुलाचे बांधकाम करणाऱ्या वाहनांची नक्षलवादयांनी बुधवारी जाळपोळ केली. या घटनेचा तीव्र निषेध करीत नागरिकांनी नक्षलवाद्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. तसेच नक्षलवाद्यांना न जुमानता रस्त्याचे काम पुन्हा सुरू करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
हेही वाचा- Global Covid-19 Tracker : जगभरात कोरोनामुळे 82 हजारहून अधिक नागरिकांचा मृत्यू
अहेरी तालुक्यातील किष्टापूर नाल्यावरील पुलाचे बांधकाम देचलीपेठा पंचक्रोशीतील १६ गावातील नागरिकांच्या वर्षानुवर्षे मागणीनुसार सुरू करण्यात आले होते. पुलाअभावी १६ गावातील अनेक आजारी रुग्णांना, गर्भवती स्त्रियांना उपचाराअभावी आपले प्राण गमवावे लागले. अनेक अर्भकांनी हे जग न पाहताच मातेच्या गर्भातच आपला जीव सोडला. या पुलाचे महत्व ज्यांचे नातेवाईक उपचाराअभावी मरण पावले, त्यांनाच समजू शकेल. निष्पाप आदिवासी बांधवांची हत्या करणाऱ्या नक्षलवाद्यांना त्यांची महती कदापि कळणार नाही, असे म्हणत गावकऱ्यांनी नक्षलवादाचा प्रतिकात्मक पुतळा तयार करुन त्याची होळी केली.
यावेळी ग्रामस्थांनी 'नक्षलवाद मुर्दाबाद, नक्षलवाद्यांना नको विकास जाळपोळ करुन गाव केली भकास, तसेच किष्टापूर नाला झालाच पाहीजे अशा प्रकारच्या घोषणा देवून नक्षलवाद्यांचा जाहीर निषेध व्यक्त केला. किष्टापूर नाल्यावरील पुलाच्या रुपाने पंचक्रोशीतील आदिवासी जनतेच्या मनामध्ये एक आशेचा किरण-दिसत असताना नक्षलवाद्यांनी स्वतःला अडचणीचा ठरणाऱ्या या पुलाच्या बांधकामावरील वाहनांची जाळपोळ करुन आपला हेतू साध्य केला आहे.
परंतु, आदिवासींच्या विकासामध्ये आडकाठी निर्माण करुन स्वत:चा फायदा पाहणारे नक्षलवादी यांच्या या क्रुरतेला आदिवासी बांधव कदापि सहन करणार नाहीत. कोविड-१९ विषाणुच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील रस्त्यांची कामे बंद असून सर्व कंत्राटदारांना रस्त्यांच्या कामावरील वाहने सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाकडून यापूर्वीच निर्देश देण्यात आलेले आहेत. कोरोना आटोक्यात आल्यानंतर पुन्हा रस्त्यांच्या बांधकामाला सुरुवात केली जाणार आहे.