गडचिरोली - जिल्ह्यात मेडिकल कॉलेज स्थापन व्हावे, यासाठी सर्व पर्यायांवर चर्चा झाली. गडचिरोलीत वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेसाठी आदिवासी विभागाकडून निधी मिळणार असल्याची माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा त्यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
'गडचिरोली जिल्ह्यातील प्रलंबित मेडिकल कॉलेजच्या कामाला गती दिली जाणार असून जागेसाठी विविध पर्यायांवर चर्चा झाली. याबाबत लवकरच जिल्हाधिकारी, शल्य चिकित्सक यांना बैठकीसाठी मुंबईला बोलवणार' असेही वडेट्टीवार यावेळी म्हणाले.
हेही वाचा - पद्मश्री पुरस्कारांची घोषणा; पोपटराव पवार आणि राहीबाई पोपरे यांचा समावेश
गडचिरोलीचा प्रामुख्याने समावेश करुन 'चांदा ते बांधा' या योजनेचा विस्तार करण्यात येणार आहे. इतर मागास वर्गातील अपंग, विधवा, परितक्त्या महिलांसाठी गडचिरोलीमध्ये ३०० घरांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. याबाबत लवकरच शासन निर्णय काढण्यात येणार आहे.
हेही वाचा - ...म्हणून खासदार धैर्यशील माने अन् पोलीस अधिकाऱ्यांमध्ये उडाली शाब्दीक चकमक
इतर मागास वर्गातील लोकांसाठी ओबीसी महामंडळाकडून १ लाख रुपयांपर्यंत बीनव्याजी कर्ज पूरवठा व्यवसायासाठी मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्येही गडचिरोलीसाठी ३०० लोकांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. याबाबत आवश्यक माहिती इच्छुकांना देण्यात यावी, अशा सूचना संबंधित विभाग प्रमुखांना वडेट्टीवारांनी दिल्या. पोलीस भरती प्रक्रिया लवकरच सुरू होईल. बिंदू नियमावलीबाबत लवकरच शासन निर्णय येणार असून जिल्ह्यातील रिक्त पदे तात्काळ भरावीत, असेही निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.