गडचिरोली - जिल्ह्यात सोमवारी सायंकाळच्या सुमारास वादळी पावसाने हजेरी लावली. या वादळामुळे कुरखेडा येथील भारत दूरसंचार निगमचा टॉवर अक्षरशः पत्यासारखा कोसळला. वादळामुळे कुरखेडा शहरासह कोरची, आरमोरी, गडचिरोली, चामोर्शी आदी तालुक्यात मोठे नुकसान झाले.
एकीकडे राज्यात कोरोनाचे थैमान पसरले असताना दुसरीकडे वादळी वाऱ्यासह येत असलेल्या पावसाने नागरिकांना बेजार करून टाकले आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरणात सतत बदल घडून येत आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह ढगाळ वातावरण होत असल्याने अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. सांयकाळच्या सुमारास कुरखेडा शहरात जोरदार वादळ सुटले. या वादळामुळे विद्युत तारा तुटून पडल्या, झाडे उन्मळून पडली. या वादळाचा तडाखा बीएसएनएलच्या टॉवरलाही बसला. शहरातील सर्वात उंच असलेला बीएसएनएलचा टॉवर अक्षरशः पत्यासारखा खाली कोसळला. तर, वादळामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.