गडचिरोली - किटकनाशक औषध फवारणी केल्यानंतर जेवण केल्याने विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यात दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर एका शेतकऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना तालुक्यातील गुड्डीगुड्डम परिसरातील झीमेला गावात घडली.
हेही वाचा- रिलायन्स कंपनीच्या संचालकपदावरून अनिल अंबानी स्वत: पायउतार
गंगा चिनू आत्राम (वय 50) व मल्ला लचमा सडमेक (वय 55) अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहेत. तर मलया आत्राम (वय 60) यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गंगा आत्राम यांच्या शेतात रब्बी पिकावर औषध फवारणी करण्यासाठी तिघेही गेले होते. फवारणी केल्यानंतर त्यांनी जवळच असलेल्या तलावातील मासे पकडून शेतातच स्वयंपाक केला. फवारणीचे काम आटोपल्यानंतर तिघांनीही एकत्र जेवण केले. मात्र, अर्ध्या तासातच तिघांचीही प्रकृती बिघडली.
तिघांनाही अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात गंगा अत्राम यांचा मृत्यू झाला. तर मल्ला सडमेक यांना चंद्रपूरला हलवण्यात आले. मात्र, त्यांचाही मृत्यू झाला. फवारणी केल्यानंतर स्वयंपाक करताना व्यवस्थित हात न धुतल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.