गडचिरोली - ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी सुरुवात केलेला गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्प आज म्हणजेच 23 डिसेंबरला 46 वर्ष पूर्ण करत 47 व्या वर्षात पदार्पण करत आहे. 23 डिसेंबर 1973 ला एका लहानशा झोपडीत सुरुवात केलेली आरोग्य सेवा आज वटवृक्ष होऊन 50 एकरामध्ये पसरलेली आहे. आधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज अशा रुग्णालयातून निरंतर आरोग्य सेवा देणारा लोकबिरादरी प्रकल्प हा आदिवासी समाजाचा श्वास आहे.
हेही वाचा - पुनर्प्रक्रिया केलेल्या सांडपाण्यातून महापौर बंगल्यातील बाग फुलणार
गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम घनदाट जंगलात तब्बल 46 वर्षापासून बाबा आमटे यांचे पुत्र डॉ. प्रकाश आमटे व त्यांच्या पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे हे दाम्पत्य लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासींना उत्तम आरोग्यासह सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्याचे कार्य करत आहेत. या महान कार्यात आता आमटे परिवारातून डॉ. दिगंत आमटे व डॉ. अनघा आमटे यांनी आरोग्य सेवेचे व्रत घेतले आहे. तर, सामाजिक व शैक्षणिक कार्याची जबाबदारी अनिकेत आमटे व समीक्षा आमटे हे सांभाळत आहेत.
हेही वाचा - शाळांच्या अनुदानाचे धोरण बदली; राज्यात अनुदानित शिक्षण संस्थांना मिळणार बळ
1973 ला या कार्याला सुरुवात केली, तेव्हा या भागातील आदिवासी जमातींपर्यंत वीज, शिक्षण व आरोग्याच्या मुलभूत सुविधा पोहोचल्या नव्हत्या. ही सारी आव्हाने असतानाही डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांनी जंगलात कंदीलच्या उजेडात राहून दिवस काढत आदिवासींच्या आरोग्याची काळजी घेतली. नागरिकांसह प्राण्यांशींही त्यांचे नाते जोडले गेले.
अनेक क्षेत्रात सामाजिक कार्यात निरंतर सेवा देणाऱया लोकबिरादरी प्रकल्पाला आज 46 वर्षे पूर्ण होऊन 47 व्या वर्षात पदार्पण होत आहे. त्यासाठी विविध कर्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आमटे यांच्या या कार्यास 'ई टीव्ही भारत'चा सलाम....