गडचिरोली- तेलंगाणातील प्रसिद्ध मेडारम येथील सम्मक्का सारक्का यात्रेला फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरवात होत आहे. या यात्रेला जवळपास सातशे वर्षांची परंपरा असून महाराष्ट्रातील अनेक भाविक यात सहभागी होत असतात. या भाविकांच्या सोईसाठी तेलंगणाच्या भुपालपल्ली ते महाराष्ट्राच्या सिरोंचा मार्गावर 100 बस चालवण्याचा निर्णय तेलंगाणा परिवहन विभागाने घेतला आहे. आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची ही जत्रा असून हे आदीवासींचे श्रध्दास्थान आहे.
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात माघ शुद्ध पोर्णिमा अर्थात 4 तारखेपासुन या यात्रेला सुरुवात आहे. महराष्ट्रातील असंख्य आदीवासी बांधव यात सहभागी होत असतात. त्यांच्या सोयीसाठी तेलंगणाच्या भुपालपल्ली आगारातुन 100 बस सिरोंचा मार्गावर सुरू करण्याचा निर्णय तेलंगाणा परिवहन विभागाने घेतला आहे.
तेलंगणा राज्यातील पुर्वीचे वारंगल आणि आताच्या मुलुगु जिह्यातील मेडारम या गावात समक्का सारक्का जत्रा भरते. दर 2 वर्षांतून भरणाऱ्या या जत्रेत महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेशसह ओडीशा राज्यांतुन एक कोटीच्यावर भाविक हजेरी लावतात. यापुर्वी तेलंगणा राज्यातील 50 बस नदीच्या पलीकडे महाराष्ट्राच्या सिमेवर असलेल्या कालेश्वरपर्यंत येऊन थांबत. महाराष्ट्रातील भाविक डोंग्याने गोदावरी नदी पार करुन जायचे. मात्र, या वर्षी नदीवर पुल झाल्याने महाराष्ट्रतील भाविकांची सोय व्हावी यासाठी भूपालपल्ली बस आगारातून थेट सिरोंचा ते मेडारम 100 बसची व्यवस्था केली जाणार आहे, अशी माहिती आगार व्यवस्थापक लक्ष्मी धर्मा यांनी दिली आहे.
सिरोंचा बसस्थानाकाच्या लगत असलेल्या खुल्या जागेत (नगरम चौक) बस थांबा नियोजन करण्यास नगरपंचायत प्रशासनाने मंजुरी दिली. 4 ते 8 फेब्रुवारीपर्यंत दर 10 मिनिटाला एक बस फेरी असे नियोजन आहे. नगरपंचायतीचे उपाध्यक्ष राजू पेद्दपल्लींनी ही माहिती दिली आहे. यावेळी भूपालपल्ली आगाराचे व्यवस्थापक लक्ष्मी धर्मा आणि सहायक अधिकारी बुरी तिरुपती, के.के. श्रीनिवास उपस्थित होते.