गडचिरोली - तालुक्यातील खुर्सा (नवेगाव) च्या शेजारी नाल्याजवळ मंगळवारी एक पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला. हा परिसर चातगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येतो. दुसऱ्या वाघासोबत झालेल्या झटापटीत त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. मृतावस्थेत आढळलेला वाघ पूर्ण वाढ झालेला आहे. त्याचे वय अंदाजे 5 ते 7 वर्ष आहे.
सोमवारी रात्री गावात वाघ प्राणांतिक ओरडत असल्याचा आवाज गावकऱ्यांना आला. त्यामुळे काही नागरिकांनी वनविभागाला रात्रीच याची माहिती दिली. मात्र, वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी मंगळवारी सकाळी पोहोचले. तेव्हा वाघ नाल्याजवळ जंगलात मृतावस्थेत पडला होता. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनेचा पंचनामा केला. यानंतर वाघाचा मृतदेह चातगाव वनपरिक्षेत्र कार्यालयात आणण्यात आला.
प्राथमिक पंचनाम्यावरून दोन वाघांची जोरदार झडप झाली. त्यात सदर वाघाचा मृत्यु झाला आहे तर दुसरा वाघ जखमी झाला, अशी शक्यता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच जखमी वाघ हिंसकही झाला असण्याची दाट शक्यता वन अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.
हेही वाचा - सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातील वाघिणीची कोरोना चाचणी, उद्या येणार अहवाल
घटनेनतंर गावातील नागरिकांनी या वनक्षेत्रात जाऊ नये, अशा सुचना देण्यात आल्या आहेत. वाघाच्या मृत्युसंदर्भात शवविच्छेदनानंतर वनविभागाकडून कळविले जाणार आहे.
काही महिण्यांपूर्वी याच जंगलात ब्रह्मपूरी वनविभागातून कॉलर आयडी लावलेली वाघिण मरण पावली होती. तिच्या मृत्त्यूचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.