चंद्रपूर : चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील वाघांची शिकार करणारी एक आंतरराज्यीय टोळी सक्रिय असून याचा नुकताच पर्दाफाश झाला आहे. हरियाणा, तेलंगाणा ते आसामपर्यंत याचे तार जुळलेले असल्याचे समोर आले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वाघाची शिकार केल्याच्या प्रकरणी आसामच्या गुवाहाटी वनविभागाने बावरीया टोळीच्या तिघांना वाघाच्या कातडीसह अटक केली होती. तर चौकशीसाठी 16 जणांना ताब्यात घेतले आहे.
बावरीया टोळीतील सोळा जण ताब्यात : या टोळीतील काही सदस्य चंद्रपूर, गडचिरोली वनक्षेत्रात असल्याची माहिती आरोपींनी दिली होती. याच माहितीच्या अनुशंगाने चंद्रपूर, गडचिरोली वन पथकाने गडचिरोली जिल्ह्यातील आंबेशिवणी येथून बावरीया टोळीतील सोळा सदस्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून वाघाचे पंजे, नख, शस्त्र आणि ४६ हजार रुपये जप्त केले आहेत. आसाम येथे पकडण्यात आलेल्या शिकारप्रकरणी आणि देशातील विविध भागांतील शिकार प्रकरणांत या टोळीचा समावेश असल्याची माहिती आहे. गुवाहाटी, आसाम राज्य येथील पोलिसांनी तसेच वनविभागाच्या पथकाने वाघाच्या शिकार प्रकरणी हरयाणा राज्यातील बावरीया जमातीच्या तिघांना वाघाच्या कातडीसह आगोदरच अटक केली होती.
शिकारीसाठी टोळी गडचीरोलीत : वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो, नवी दिल्ली यांनी देशातील सर्व प्रमुख व्याघ्र प्रकल्पांच्या सभोवतालच्या क्षेत्रांत वाघांच्या शिकारीची शक्यता असल्याची सुचना दिली होती. यानंतर ताडोबा क्षेत्रसंचालकांनी तीन सदस्यांचे पथक गुवाहाटी येथे रवाना केले होते. या पथकाने गुवाहाटी येथे कारागृहात असलेल्या आरोपींची चौकशी केली. या चौकशीत शिकारी टोळीमधील काही सदस्य गडचिरोली वनविभागाच्या क्षेत्रात फिरत असल्याची माहिती दिली.
धुळ्यात काही संशयित ताब्यात : त्यानंतर वनविभागाने शोधमोहीम राबविली. गडचिरोलीजवळ आंबेशिवणी येथे तीन झोपड्यांत काही लोक राहत असल्याची माहिती मिळाली. याच माहितीच्या आधारे वनविभाग, पोलिसांनी छापा टाकला. या तीन झोपड्यांत शिकारीचे साहित्य, शस्त्र, वाघाचे नख, पंजे आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी बावरीया टोळीतील सोळा जणांना ताब्यात घेण्यात आले. तेलंगणातील करीमनगर, धुळे येथूनही काही संथयितांना वनविभागाने ताब्यात घेतले आहे. संशयितांवर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ मधील तरतुदींनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. देशातील विविध भागांतील शिकार प्रकरणात या टोळीचा समावेश असल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास विशेष कार्य दल करीत आहे.
हेही वाचा - Naxalites Killed in Gadchiroli : गडचिरोलीत पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये चकमक; तीन नक्षलवादी ठार