गडचिरोली - चामोर्शी तालुक्यातील वैनगंगा नदीकाठावरील शेतशिवारात गेल्या अनेक दिवसांपासून पट्टेदार वाघाचा वावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
हेही वाचा - तुम्हाला माहीत आहे का? राज्यपाल आमदार नसलेल्या व्यक्तीलाही बनवू शकतात मुख्यमंत्री
वैनगंगा नदीकाठावर चीचडोह बॅरेजचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. नदीच्या पलीकडे चंद्रपूर जिल्हा असून या जिल्ह्यातील झुडपी जंगलात वास्तव्य असलेला वाघ नदी ओलांडून गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाला आहे. काठावर पूर्ण शेतशिवार असल्याने अनेकांच्या शेतामध्ये वाघाच्या पंजांचे ठसे आढळून आलेत. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांमध्ये वाघाची दहशत आहे.
हेही वाचा - होय आम्ही पवारांच्या संपर्कात; संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे सत्तेची समीकरण बदलणार का?
अनेकांना वाघाचे दर्शन झाल्याने एकट्याने शेतावर जाणे अनेक शेतकरी टाळत आहेत. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून 'पगमार्क' शोधून काढले. मात्र, शेतशिवारात धान पिकाची लागवड असल्याने वाघाला पकडण्यासाठी अडचणी येत आहेत. सध्या धान कापणीचा हंगाम असल्याने शेतकऱ्यांना नेहमीच शेतावर जावे लागते. अशा स्थितीत वाघाने कुणावर हल्ला केल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.
आज(मंगळवार) सकाळी मार्कंडा शेतशिवारातही वाघाच्या पंजांचे ठसे आढळून आले. त्यामुळे वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.