गडचिरोली - चामोर्शी तालुक्यातील आष्टी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या राममोहनपूर येथे मच्छी खड्यास लावलेल्या विद्युत प्रवाहाने 3 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडकीस आली आहे. राजू रामकृष्ण बिस्वास (18), विरकुमार सुभाष मंडल (11) आणि कमला बिस्वास (65) अशी मृतकांची नावे आहे.
विद्युत प्रवाह लावणाऱ्या शेतकरी पोलिसांच्या ताब्यात -
राममोहनपूर येथील शेतकरी रामक्रीष्ण बिस्वास याने आपल्या शेततळ्यात मच्छी टाकली होती. ती कोणी चोरुन नेऊ नये म्हणून त्याने सभोवताली वीज प्रवाह लाऊन ठेवला होता. दरम्यान, सकाळी 11वाजताच्या सुमारास राजू बिस्वास व विरकुमार मंडल हे शेतात गेले असता त्या दोघांना जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने वेढले व त्यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र, सायंकाळी विरकुमारची आई कमला बिस्वास हिने कामावरुन घरी आल्यावर शेजाऱ्याकडे विचारपूस केली असता, तीचा मुलगा शेतावर गेला असल्याचे तिला कळले. बराचवेळानंतर दोघेही परत न आल्याने ती सुद्धा शेतात गेली. तेव्हा तिला राजू बिस्वास हे जमिनीवर पडल्याचे आढळून आले. त्याला नेमके काय झाले, हे बघायला ती गेली असता, सुरू असलेल्या विद्युत प्रवाहामुळे तिचाही मृत्यू झाला. मात्र, तिच्या मागे येणारी बसंती मंडल ही प्रसंगावधान राखून दूरच उभी राहिली. त्यामुळे तिचा जीव वाचला. त्यानंतर बसंतीने घटनेची माहिती गावात आणि पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनाकरिता आष्टी ग्रामीण रुग्णालयात पाठवले. तसेच या घटनेची तक्रार नोंदवण्यात आली असून ज्या शेतकऱ्याने शेतात विद्युत प्रवाह लावला होता. त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.