गडचिरोली - महाराष्ट्र आणि तेलंगणा या २ राज्यांना जोडणाऱ्या प्राणहिता नदीवरील आंतरराज्यीय पुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. आगामी निवडणुकांमुळे पुलाच्या लोकार्पणासाठी लगीनघाई सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असल्याने लवकरच पुलाचे लोकार्पण होणार आहे.
या पुलामुळे महाराष्ट्र, तेलंगणा आणि छत्तीसगड राज्यातील लोकांचा संपर्क वाढणार आहे. हा पूल राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३चा एक भाग असून तेलंगणा राज्यातील चेन्नूर आणि मंचेरीयाला जाण्यासाठी याद्वारे सोयीचे ठरणार आहे. १२९ कोटी रुपये खर्च करून हा पूल बांधण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या सिरोंचा येथे ३ राज्यांची सीमा एकत्र येते. कायम विकासापासून वंचित असलेल्या सिरोंचा तालुक्यातील लोकांना स्वतःच्या जिल्ह्यात न जाता इतर राज्यात जाणे कधीही परवडणारे आहे. या परिसरातील लोकांना विविध कामासाठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वैद्यकीय गरजा, किराणा सामान इतर मूलभूत सोयी-सुविधांसाठी मागील अनेक वर्षांपासून लाकडी बोटीच्या साहाय्याने जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. जिल्हा मुख्यालयाचे २५० किलोमीटर अंतर परवडणारे नसल्याने येथील लोकांचा संपर्क नेहमीच तेलंगणा राज्यासोबत आलेला आहे. आता हा जीवघेणा प्रवास सुखकर होणार असल्याने लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
प्राणहिता नदीवर २०१६ पासून सुरू झालेल्या पुलाचे बांधकाम नोव्हेंबर २०१८ पर्यंत पूर्ण करायचे होते. मात्र, विविध कारणांमुळे बांधकाम संथगतीने करण्यात आले. पावसाळ्यानंतर बांधकामाला पुन्हा गती देण्यात आली असून हा पूल लोकार्पणासाठी सज्ज असल्याचे दिसून येत आहे.