गडचिरोली - आदिवासीबहुल, जंगलव्याप्त, नक्षलग्रस्त अशी गडचिरोली जिल्ह्याची ओळख आहे आहे. या भागात मोठ्या प्रमाणात वनांवर आधारित रोजागार उपलब्ध होऊ शकतो. मात्र, नक्षलवाद्यांच्या भीतीने वन विभागाची सर्व कामे ठप्प आहेत. दक्षिण गडचिरोली जिल्ह्यात सध्या तेंदुपत्ता तोडण्याची कामे जोमात सुरू असून यामुळे अनेक आदिवासींना रोजगार मिळाला आहे.
जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळ्यात बांबू कटाई आणि तेंदुपत्ता तोडण्याची कामे होतात. या दरम्यान हजारो आदिवासी मजुरांना काम मिळते. मात्र, यावर्षी कोरोना संकट ओढावल्याने दीड-दोन महिन्यांपासून मजुरांना रोजगार नव्हता. लॉकडाऊनमुळे तेंदुपत्ता तोडणी हंगाम सुरू होणार की, नाही असा प्रश्न मजुरांना पडला होता. लॉकडाऊनमध्ये शासनाने शिथिलता दिल्याने तेंदुपत्ता तोडणीची कामे सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे सध्या शाळकरी मुलांपासून ते वयोवृद्ध मजुरांनादेखील रोजगार मिळाला आहे.
तेंदुपत्ता तोडणीच्या हंगामात अनेकांना रोजगार मिळतो. पानांची तोडणी आणि उल्टाई-पल्टाईची कामे करण्यासाठी शाळकरी मुले आणि वयोवृद्धांनाही सहभागी करून घेतले जाते. शिक्षण घेणाऱ्या तरुणांना नोंदणी आणि हिशोबाची कामे दिली जातात. या कामातून मिळालेल्या पैशांवरच आदिवासींचे वर्षाचे आर्थिक नियोजन अवलंबून असते. आदिवासी ग्रामीण भागातील अर्थचक्राला संजीवनी देणारा हा तेंदुपत्ता तोडणी हंगाम असतो.