गडचिरोली - महाराष्ट्र शासनाच्या वतीने १ जुलै हा दिवस 'कृषी दिन' म्हणून साजरा होतो. या दिवसाचे निमित्त साधत, गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम कोरची तालुक्यात प्रशासनाने एक अनोखा उपक्रम राबविला. कोरची तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी व सामान्य नागरिक यांनी एकत्र येत तब्बल 52 हजार सीताफळ बियांची लागवड केली. यामुळे ग्रामपंचायतींचे उत्पन्न वाढणार असून बचत गटांना सीताफळ विक्रीचा उद्योग मिळणार आहे.
कोरची तालुका घनदाट जंगलाचा भाग आहे. या भागातील 'जांभूळ' फळ फार प्रसिद्ध आहे. या पुढच्या काळात कोरची तालुक्यात सीताफळाचे उत्पन्न वाढावे, यासाठी येथील गटविकास अधिकाऱ्यांनी हा कल्पक उपक्रम राबविला आहे. सिताफळाचे झाड कुठलाही प्राणी खात नाही. याचाच फायदा घेत स्थानिक बचत गट आणि ग्रामपंचायतींना उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी 52 हजार सीताफळ बियांची लागवड कोरची ते कुरखेडा या तीन किलोमीटरच्या परिघात करण्यात आली. या उपक्रमात कोरची तालुक्यातील नागरिक व प्रशासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
आगामी काळात सीताफळाच्या लागवडीने या भागात उद्यमशीलता वाढीस लागावी, असा या मागील उद्देश आहे. यातील निम्मी झाडे जरी जगली आणि फळे देऊ लागली तरी या अभियानाचे उद्दिष्ट सफल होणार आहे. कोरची तालुक्यातील या उपक्रमाने मात्र राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे.
हेही वाचा - भामरागडमध्ये यंदाही पूरपरिस्थिती राहण्याची शक्यता; दरवर्षी पावसाळ्यात २०० गावांचा तुटतो संपर्क
हेही वाचा - गडचिरोलीच्या जंगलात मृतावस्थेत आढळला वाघ; झटापटीत प्राण गमावल्याची शक्यता